स्मरणशक्ती वाढीस कारणीभूत योगासने व व्यायाम

excersie
वॉशिंग्टन – संशोधकांनी मानवी मेंदूला विचार करायला लावणारे व्यायाम केल्यास शरीराला व्यायामाचा विशेष लाभ होत असल्याचा निष्कर्ष मांडला असून योगासनांमुळेही स्मरणशक्ती वाढत असल्याचा निष्कर्षही त्यांनी काढला आहे.

‘परसेप्च्युअल ऍण्ड मोटर स्किल्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकात डॉ. रॉस अलोवे यांचा संबंधित शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. पूर्वकल्पना नसलेली कृती करताना मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांचा समन्वय वाढीला लागतो. ही क्रिया मेंदूसाठी शाळेच्या वर्गात बसून अभ्यास करण्यापेक्षा अधिक लाभदायक असल्याचे डॉ. अलोवे यांनी म्हटले आहे. झाडावर चढण्यासारखे व्यायाम केल्यास काही तासांमध्येच स्मरणशक्ती वाढल्याचे आश्‍चर्यकारक अनुभव संशोधनादरम्यान आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संशोधनासाठी त्यांनी १८ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांना सहभागी करून घेतले. शरीराची अवस्था आणि अभिमुखतेवर स्मरणशक्ती अवलंबून असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

या अभ्यासादरम्यान, सहभागी लोकांना झाडावर चढण्यासह तीन इंच रूंद लोखंडी पट्टीवरून रांगणे आणि चालणे, शरीर ताठ ठेवून हालचाली करणे, पायात काहीही न घालता चालणे, अडथळ्यांच्या वरून, खालून आणि सभोवतालून स्वत:चा मार्ग शोधणे यासारख्या क्रियांचा समावेश होता. त्यानंतर, लागोपाठ त्यांच्या स्मरणशक्तीच्या चाचण्याही घेण्यात आल्या. यात, जे लोक आधीपासून योगासने करीत होते, त्यांच्या स्मरणशक्तीत विशेष वाढ नोंदविण्यात आल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment