रशियन बोक्याच्या जीवावर बेतली रात्रीत केलेली ऐयाशी


द, चीनच्या गुआन्डोंग भागात एका बोक्याची एक वेगळीच अडचण समोर आली असून ऐकल्यावर रडावे की हसावे असा संभ्रम कुणाला पडला तर नवल वाटायला नको. हा बोकोबा रशियन ब्लू जातीचा असून या पठ्ठ्याने एका रात्रीत पाच मांजरीच्या बरोबर प्रणयलीला केल्याने त्याला इतका अशक्तपणा आला की शेवटी त्याला ग्लुकोज चढवावे लागले असे समजते.

या मार्जारपुंगावाचे नाव शिओपी असे आहे. त्याच्या मालकाने त्याला काही काळासाठी पाळीव प्राणी होटेल मध्ये ठेवले होते. पण या पेट हॉटेल कर्मचाऱ्यांनी रात्री मांजरांना पिंजऱ्यात न ठेवता मोकळे सोडले होते. सकाळी पहिले तर शिओपी बोक्याला चांगलाच अशक्तपणा आला होता. त्याच्या मालकाने हॉटेल कर्मचाऱ्यांनी शिओपीची हेळसांड केल्याचा आरोप केला तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले गेले. त्यात शिओपीनी एका रात्रीत किमान पाच मांजऱ्यासोबत रोमांस केल्याचे दिसून आले आणि शिओपीच्या अशक्तपणामागचे कारण उघड झाले. मग त्याला ग्लुकोज दिले गेले.

ज्या मांजऱ्यांसोबत शिओपीने रोमांस केला त्या मांजऱ्यांच्या मालकांना त्याबद्दल सांगितले गेले तेव्हा त्यांनी मांजरीला पिले झाली तर त्यातील एक शिओपीच्या मालकाला भेट म्हणून देण्याचे कबुल केले आहे. शिओपीच्या आजारपणाचा खर्च हॉटेलने उचलला आहे. रशियन ब्लू जातीची मांजरे चीन मध्ये लोकप्रिय असून त्यांच्या किमती ३० हजारापासून ८७ हजारांपर्यंत आहेत असे समजते.

Leave a Comment