टाटा नेक्सोन इव्हीचे प्रमोशन करणार मिलिंद सोमण


टाटा मोटर्सने त्यांच्या झिपट्रॉन इलेक्ट्रिक पॉवर तंत्रज्ञानावर आधारित पहिली इलेक्ट्रिक नेक्सोन इव्ही २०२० च्या सुरवातीला बाजारात आणली जात असल्याची घोषणा केली असून या कारच्या प्रमोशनसाठी अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर यांना करारबद्ध केले असल्याचे म्हटले आहे. ‘द अल्टिमेट इलेक्ट्रिक ड्राईव्ह’ अंतर्गत मिलिंद आणि अंकिता मनाली लेह रस्त्यावर ही कार चालविताना दिसतील. विशेष म्हणजे मनाली लेह हा भारतातील दुर्गम रस्त्यांपैकी एक असून या मार्गावर टेस्टिंग केली जाणारी ही देशातील पहिलीच इलेक्ट्रिक सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मिलिंद अंकिता भारताच्या विविध भागात या कारमधून प्रवास करताना दिसतील. कोणत्याही तापमानात, कोणत्याची विभागात आणि कितीही उंचीवरच्या प्रदेशात चालण्यास ही कार सक्षम आहे असा दावा कंपनीने केला असून या कारचा एक व्हिडीओ नुकताच जारी करण्यात आला आहे. यात गाडीसंबंधी अधिक माहिती दिली गेलेली नाही, व्हिडीओतील कार हे प्री प्रोडक्शन प्रोटोटाईप असून प्रोडक्शन कार स्टाईल थोडी वेगळी असेल असे समजते.

झिपट्रॉन इलेक्ट्रिक पॉवर तंत्रज्ञानाबाबत टाटाचे म्हणणे असे की या तंत्रज्ञानावर आधारित सर्व वाहने एका चार्ज मध्ये २५० किमी अंतर कापू शकतात. यात लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो आणि नेक्सोन साठी वापरण्यात आलेल्या बॅटरी ८ वर्षाच्या गॅरंटी सह येईल.

Leave a Comment