इंडिगोच्या फ्लाईट मध्ये के.सिवन यांच्यासोबत सेल्फीसाठी गर्दी


भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांची साधे सरळ गृहस्थ अशीच ओळख असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा इंडिगोच्या एका फ्लाईटमध्ये प्रवाशांना नुकताच आला. इस्रोचे प्रमुख के. सिवन अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे या फ्लाईटच्या इकोनोमी वर्गात चढले आणि सर्वप्रथम विमानातील क्रू मेम्बर्सनी त्यांना ओळखले तेव्हा हवाई सुंदरी पासून सर्व क्रूने त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली. सिवन यांनी सर्वांसोबत अगदी शांतपणे सेल्फी काढून घेतल्या आणि त्यांनी केलेल्या हार्दिक स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले.

या संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विमानातील प्रवासी सिवन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना आणि सेल्फी काढून घेताना दिसत आहेत. टाळ्यांच्या गजरात विमानात सिवन यांचे स्वागत केले जातानाही दिसत आहे. सिवन अगदी सौम्य हसत या स्वागताचा स्वीकार करताना दिसत आहेत. या घटनेचे साक्षीदार असणाऱ्यांनी हे फोटो शेअर केले असून त्याखाली विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका मध्ये भारत खऱ्या अर्थाने बदलतो आहे, पूर्वी सिनेतारेतारका आणि क्रिकेटपटू यांचेच जोरदार स्वागत केले जात असे, त्यांच्यासोबत सेल्फी साठी गर्दी होत असे. आता मात्र खऱ्या हिरोंना योग्य तो मान मिळत आहे हे पाहून अभिमान वाटतो. आपण योग्य दिशेने चाललो आहोत असे म्हटले गेले आहे तर दुसऱ्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन याच्या मातापित्यांना असाच विमानात उभे राहून प्रवाशांनी सन्मान दिला होता, भारत बदलतोय याचे हे उदाहरण आहे असे म्हटले गेले होते.

चांद्रयान २ मोहिमेत विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य लँडिंग झाले नसले तरी देशभरातून सिवन यांच्या प्रयत्नांचे कौतुक झाले होते. विक्रम लँडर योग्य प्रकारे उतरू शकलेला नाही हे स्पष्ट झाल्यावर सिवन यांना अश्रू आवरता आले नव्हते तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची गळाभेट घेतली होती.

Leave a Comment