आफ्रिकेवर मात करत भारताची मालिकेत 1-0 आघाडी

दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या 395 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 191 धावापर्यंतच मजल मारता आली. या विजयाबरोबर भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावत 502 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. पहिल्या डावात सलामी जोडी मयंक अग्रवालने 215 आणि रोहित शर्माने 176 धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली होती. भारताच्या विशाल धावांचा पाठलाग करताना डेन एल्गर आणि क्विंटन डी-कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 431 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने विकेट्स घेतले होते.

दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या 127 धावांच्या खेळीनंतर भारताने 4 बाद 323 धावांवर डाव घोषित करत आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 191 धावांवरच गारद झाला. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने 5 आणि अश्विनने 4 विकेट्स घेतले. दुसऱ्या डावात आफ्रिकेकडून मार्करम (39), डेअन एल्गन (2), थ्यूनिस डी ब्रूइन (10), टेम्बा बावूमा (0), फाफ डु प्लेसिस (13), क्विंटन डि कॉक (0), सेनेरून मुथुसॅमी (49), वर्नोन फिलेंडर (0), केशव महाराज (0), डेन पेंडित (56) आणि रबाडाने 18 धावा केल्या.

याचबरोबर अश्विनने दुसऱ्या डावात थ्युनिस डी ब्रुइनला बाद करत कसोटी सर्वात जलद 350 विकेट घेण्याच्या मुथ्थया मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विनने 66 व्या सामन्यात 350 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.

दोन्ही संघामधील दुसरा कसोटी सामना 10 सप्टेंबरला पुण्यात खेळला जाणार आहे.

 

Leave a Comment