अधूनमधून खाणे धोकादायक

food
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी खूप आटापिटा करतात. पण त्यांचे वजन काही कमी होत नाही. उलट त्यांना असा अनुभव येतो की, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात त्यांचे वजन उलट वाढत चालले आहे. त्यांना तर वाटते आपण कमी खातो. खरे म्हणजे ते कमी खात असतात म्हणजे कमी जेवत असतात. मग कमी जेवत असताना त्यांचे वजन कमी का होत नाही? याचे उत्तर असे की, ते कमी जेवत असले तरी दोन जेवणाच्या मध्ये भरपूर खात असतात. त्यांना अधूनमधून तोंडात काही तरी टाकण्याची सवय असते, ती त्यांच्यासाठी घातक ठरते.

एका महिलेचा यावर असा दावा होता की, आपण दोन जेवणाच्या मध्ये फार काही खात नाही. उगीच एखादे बिस्किट तोंडात टाकतो, चार शेंगदाणे चघळतो आणि भूक लागल्याची जाणीव झाली परंतु जेवणाची ठरलेली वेळ अजून झालेली नसेल तर एखादे आईस्क्रिम तरी खातो किंवा चार काजू पोटात ढकलतो. या पलीकडे काही नाही. अशा चार दाण्यांनी वजन वाढते की काय? असा त्यांचा सवाल होता.

त्यावर त्यांच्या आहार सल्लागारांनी त्यांना एक सल्ला दिला. आपण एखादे बिस्किट पोटात टाकले की, तेवढेच एक बिस्किट एका परातीत टाकावे. चार काजू खाल्ले की, तेवढेच चार काजू त्या परातीत ठेवावे. एक वाटी आईस्क्रिम खाल्ले की तीच वाटी परातीत ठेवावी. असे आपण दोन जेवणाच्यामध्ये जेवढे काय खातो तेवढेच खाद्य पदार्थ त्या परातीत ठेवावेत आणि संध्याकाळी त्या परातीकडे पहावे म्हणजे आपण सहज म्हणून काय आणि किती खाल्लेले आहे याची निश्‍चित कल्पना येईल.

त्या बाईने तसे केले आणि तिच्या असे लक्षात आले की, आपण दिवसभरात सहज सहज म्हणून जे काही खाल्ले आहे ते जेवणापेक्षा किती तरी जास्त आहे. वजन कमी करणार्‍यांच्या वजन कमी न होण्यामागे हे दोन जेवणाच्या मधले खाणे महत्वाचे ठरते. ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे?

आपण डाएटिंगसाठी जेवणाच्या ज्या वेळा ठरविलेल्या असतील त्या वेळा तंतोतंत पाळाव्यात. मध्येच भूक लागल्यासारखे वाटले तरी जेवणाच्या वेळेपर्यंत संयम पाळावा. या उपरही वेळा पाळणे शक्यच झाले नाही आणि संयमही राहिला नाही तर दोन जेवणाच्या मध्ये काकडी खावी. त्याशिवाय खाण्याचा मोह झाल्यास पंधरा मिनिटानंतर खावे. पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला असे लक्षात येते की, पंधरा मिनिटांपूर्वी आपल्याला झालेली खाण्याची भावना ही खरी भूक नव्हती आणि पंधरा मिनिटानंतर खाण्याची इच्छा राहिलेली नाही. अनेकदा केवळ चैन पडत नाही म्हणून खाल्ले जाते. अशावेळी मन इतरत्र गुंतवावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment