आरेत 400 झाडांची कत्तल; मेट्रो कारशेड परिसरात कलम १४४ लागू


मुंबई – आरे येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरील झाडे न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी रात्रीच तोडायला सुरुवात झाली. जवळपास चारशेहून अधिक झाडे शुक्रवारी रात्रीत कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलीस सुरक्षेत झाडे तोडण्याचे हे काम सुरू होते. विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीची माहिती समजाताच कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कोणालाही कारशेडच्या जागी प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचे वातावरण होते. पोलीस आणि आंदोलकामध्ये रात्रभर घमसान झाले. पोलिसांनी आंदोलन शांत करण्यासाठी आणि वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान मुंबई पोलिसांकडून आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे शुक्रवारी रात्री कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. या परिसरात त्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी आंदोलकांनी रात्री तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. मोठ्या प्रमाणात पोलीस हे आंदोलन मोडून काढण्यासाठी दाखल झाले होते. पोलिसांनी आंदोलन शांत करण्यासाठी एक-एक करून आंदोलकांना ताब्यात घेतले. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. तरी देखील अनेक आंदोलक आरेमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण मांडून होते. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना परतण्याचे आवाहनही केले. अखेर सर्व आंदोलकांना रात्री तीन वाजेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर आरेमध्ये पुन्हा झाडांची कत्तल करण्यात आली. रात्रीत जवळपास ४०० झाडांची कत्तल केल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी आरेतील मेट्रोची कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment