नितीन नांदगावकर यांच्यावर मनसेची जहरी टीका


मुंबई : नुकताच शिवसेनेत मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी प्रवेश केला. नितीन नांदगावकर यांनी मनसेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाही शिवसेनेत जाणे पसंत केल्यानंतर आता नितीन नांदगावकरांवर मनसेचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजू पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

कोण नितीन नांदगावकर ? नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि आमच्यासारखे मनसैनिक आमच्या पक्षामध्ये असल्याचे म्हणत राजू पाटील यांनी नितीन नांदगावकर यांच्यावर निशाणा साधला. नांदगावकर यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेतून त्यांचा शिवसेना प्रवेश मनसे नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

नितीन नांदगावकर यांनी राज ठाकरेच माझे दैवत आहेत आणि राहतील, असे सांगत मनसे का सोडली, याचा खुलासा केला. राज ठाकरेंनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या बडव्यांमुळे सोडली होती. राज ठाकरे हे माझे दैवत आहेत आणि राहतील. पण मला मनसे त्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे सोडावी लागल्याचे नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment