इस्रोतील शास्त्रज्ञाच्या अनैसर्गिक सेक्सनंतर पार्टनरने केला खून


हैदराबाद – हैदराबादमधील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये कार्यरत असलेले भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ एस सुरेश यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एका खासगी रक्त तपासणी प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने सुरेश यांच्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्यानंतर पैसे देण्यावरून झालेल्या वादामुळे सुरेश यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

हैदराबादमध्ये राहत्या घरात एक ऑक्टोबर रोजी सुरेश मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. हैदराबादमधील पोलिस आयुक्त अंजनी कुमार यांनी या प्रकरणी एक पत्रक जारी केले असून, त्यामध्ये या हत्येचा उलगडा कसा झाला याची माहिती दिली आहे.

पोलिसांच्या पत्रकानुसार, संबंधित तंत्रज्ञ आरोपीने सुरेश एकटेच राहात असल्याचे हेरले होते. रक्त गोळा करण्याच्या निमित्ताने तो त्यांच्या घरी जायचा. दोघांमध्ये यावेळी चांगले संबंध निर्माण झाले. त्यावेळी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्याचे आणि त्या बदल्यात पैसे घेण्याचे आरोपीचे नियोजन होते. आरोपी आणि सुरेश यांच्यात अशा पद्धतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर पैशावरून वाद झाला होता. त्याने त्यावेळीच सुरेश यांना मारण्याचा कट रचला.

आरोपी ३० सप्टेंबरला रात्री सुरेश यांच्या घरी गेला. त्याच्याकडे त्यावेळी धारदार चाकू होता. त्या रात्री दोघांमध्ये शरीरसंबंध झाल्यानंतर आपल्याकडील चाकूने त्याने सुरेश यांच्या डोक्यावर वार केले. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीतील दृश्ये, सुरेश यांचा मोबाईलमधील माहिती आणि आरोपीच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे या खुनाचा उलगडा केला.

Leave a Comment