चंदिगड मध्ये होणार सर्वात मोठ्या रावणाचे दहन


नवरात्र सुरु झाले की अनेकांना वेध लागतात दसरा म्हणजेच रामलीला आणि रावण दहनाचे. यंदा देशातील सर्वात मोठा रावण चंदिगड मध्ये उभा असून या २२१ फुटी भल्याथोरल्या रावणाला उभे करण्यासाठी १२ तास लागले आहेत. गुरुवारी दोन क्रेन, दोन जेसीबी यांच्या सहाय्याने १५० कामगारांनी या रावणाला मैदानात उभे केले. ताजिंदर सिंह यांनी हा रावण बनविला आहे. ते म्हणाले अगदी पाऊस कोसळला तरी रावण दहन होईल. आत पावसाचे पाणी जाऊ नये या पद्धतीने तो तयार केला गेला आहे.

या रावण बनविण्यासाठी ३ हजार मीटर कापड आणि दीड हजार मीटर ज्यूट मॅटचा वापर केला गेला आहे. रावणाचा हा पुतळा २२१ फुट उंच आहे. त्यांच्या मिशांची लांबी २५ फुट, जोडा ४० फुटाचा आहे तर मुकुट ६० फुट उंचीचा आहे. रावणाची तलवार ५५ फुटी असून हातातील ढाल १२ फुटी आहे. हा रावण तयार करायला ६ महिने ४० कामगार रात्रंदिवस काम करत होते. त्यासाठी ३० लाख रुपये खर्च आला असून यंदा शिव पार्वती सेवा दलाने हा खर्च दिला आहे.

ताजिंदरसिंग १९८७ पासून दरवर्षी रावण दहनाचा पुतळा तयार करत आहेत. रावण बनविण्यासाठी येणाऱ्या खर्चापोटी त्यांनी आजपर्यंत साडे बारा एकर जमीन विकली आहे. ते म्हणतात यंदाचा रावण रिमोटच्या सहाय्याने ब्लास्ट केला जाईल. त्यासाठी वेगवेगळी २० फंक्शन आहेत. पहिला ब्लास्ट झाला की प्रथम मुकुट त्यानंतर तलवार, ढाल, जोडे जळतील. त्यासाठी इकोफ्रेंडली फटके वापरले गेले असून त्यामुळे ८० टक्के कमी प्रदूषण होणार आहे.

Leave a Comment