रामेश्वर रुई – हे गाव आकाराने छोटे पण विकासात मोठे


महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील लातूर जवळ अवघी २ हजार वस्ती असलेल्या रामेश्वर रुईने केवळ भारतापुढेच नाही तर जगापुढे आदर्श निर्माण केला आहे. गावाची एकजूट, धर्मनिरपेक्षता, स्वच्छता आणि इतक्या छोट्या गावात असलेल्या अनेक शिक्षण संस्था तसेच गावातील विकास कामे यामुळे ते कौतुकाचा विषय बनले आहे.

या गावात बहुतेक सर्व सुविधा आहेत आणि विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. गावातील छोटी पण सुंदर आणि स्वच्छ घरे गुलाबी रंगाने रंगविली गेली आहेत त्यामुळे याला मराठवाड्याची पिंक सिटी असेही म्हटले जाते. म.गांधी यांचे आदर्श खेडे हे स्वप्न या गावाने प्रत्यक्षात आणले आहे. सोनावली नदीच्या काठी हे गाव वसलेले आहे. नदीच्या एका तीरावर मंदिरे आहेत तर दुसऱ्या तीरावर भव्य जामा मशीद आहे. जणू मानवतेचा सेतू येथे बांधला गेला आहे. गावात ६०० वर्षे जुने राम हनुमान मंदिर आहे.


दर महिन्यात येथे ग्राम सभा होते आणि ग्रामस्थांच्या भागीदारीतून स्वच्छता अभियान चालविले जाते. या छोटया गावात अनेक शाळा, अंगणवाड्या आहेतच पण आरोग्य केंद्र, सुसज्ज वाचनालय, व्यायामशाळा, कचरा प्रकल्प, डी एड कॉलेज अश्या सर्व सुविधा आहेत. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या एमआयटी सह अनेक शिक्षण संस्था येथे आहेत. हा सारा परिसर वास्तविक दुष्काळग्रस्त आहे पण या गावात मात्र दुष्काळ नाही. येथे वनराई प्रकल्प राबविला गेला आहे. छोट्या उद्यानांमुळे हे गाव अधिक सुंदर बनले आहे.

Leave a Comment