नवरदेवासाठी जयपूर मध्ये बनला सोन्याचा पटका


लग्न म्हणजे नवरदेवाची हौस मौज आलीच आणि हौसेला कधीच मोल नसते याचा अनुभव राजस्थानची राजधानी जयपूर येथे येत आहे. राजे महाराजे यांच्या घरातील लग्नात सोने, चांदीचे पटके किंवा साफे बांधले जातात तेही क्वचित प्रसंगी. पण जयपूर मधील एक उद्योजक मनोहरसिंह राठोड यांनी त्यांच्या जावयासाठी सोन्याचा पटका बनवून घेतला आहे.

२४ कॅरेट सोन्यात हा पटका किंवा साफा बनविला गेला असून तो १० वार लांबीचा आहे. त्यासाठी ५३० ग्राम सोने वापरले गेले असून २२ लाख रुपये खर्च आला आहे. फॅशन डिझायनर भूपेंद्रसिंह यांनी हा साफा तयार केला आहे. ते म्हणाले, आमच्याकडे चांदीच्या साफ्याचे कलेक्शन होते ते पाहून मनोहरसिंह राठोड यांनी सोन्यात तसा साफा बनवून देण्याची ऑर्डर केली तो त्यांना त्याच्या मुलीच्या लग्नात जावयाला देण्यासाठी हवा आहे.

हा साफा बनविणे तसे जिकीरीचे काम होते. बादला वर्क करणारे ५० कारागीर सतत सहा महिने त्यासाठी काम करत होते. तो प्रथम तांबे धातूत मग चांदीत आणि अखेर सोन्यात बनविला गेला. हे काम मोठे जबाबदारीचे होते आणि ते यशस्वी झाले आहे.

Leave a Comment