या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार वादग्रस्त श्रीपाद छिंदम


अहमदनगर : महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम उतरला आहे. श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून मायावतींच्या बहुजन समाज पक्ष अर्थात बसपाने उमेदवारी दिली आहे. श्रीपाद छिंदम अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात शड्डू ठोकतील.

नगर महापालिकेच्या निवडणुकीत श्रीपाद छिंदम निवडून आला. पण आता पुन्हा एकदा श्रीपाद छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची तयारी श्रीपाद छिंदमने केली आहे. छिंदमने काही दिवसापूर्वीच नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेला होता.

कोणत्या पक्षाकडून श्रीपाद छिंदमला उमेदवारी मिळणार हे अस्पष्ट होते. पण छिंदमला बसपाने उमेदवारी दिली आहे. छिंदमने नगर महापालिका निवडणूक अपक्ष लढून जिंकून दाखवली होती.

अहमदनगर महापालिकेची निवडणूक 9 डिसेंबर 2018 रोजी झाली आणि 10 डिसेंबरला निकाल लागला. अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक नऊमधून श्रीपाद छिंदम तब्बल 1970 मतांनी निवडून आला. एकूण 4532 मते छिंदमला मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना 2562 मते मिळाली. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार 100 ते 200 मतांच्या फरकाने पडले. पण छिंदमचा विजय तब्बल 1970 मतांनी झाला.

भाजपच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीत जिंकून आलेल्या छिंदमला उपमहापौर करण्यात आले होते. पण शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वसामान्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.

Leave a Comment