पत्नी केट मिडलटनसह पाकिस्तान दौऱ्यावर जाणार प्रिन्स विल्यम


पाकिस्तान दौऱ्यावर ब्रिटनचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन जाणार आहेत. पाकिस्तानमधील अनेक वेगवेगळे पदार्थ आपल्या शाही दौऱ्यामध्ये चाखून पाहण्याची इच्छा या दोघांनी व्यक्त केली आहे. विल्यम आणि केट यांनी काही दिवसापूर्वीच लंडनमधील आगा खान सेंटरला भेट दिली होती. त्यांनी यावेळी पाकिस्तानी संस्कृतीबद्दल माहिती घेतली. त्यांनी या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानी संगीतकार, आचारी, कलाकारांशीही चर्चा केली.

विल्यम आणि केट या दोघांनीही आगा खान सेंटरला दिलेल्या या भेटीदरम्यान आपल्या आगामी पाकिस्तानी दौऱ्यामध्ये तेथील अनेक पदार्थांची चव घेण्याची इच्छा व्यक्त केली. केट यांनी यावेळी मी अनेकदा घरीच करी (आमटी) बनवते. मी छोटे युवराज जॉर्ज, युवराज लुईस आणि युवराज्ञी शार्लोटसाठी कमी तिखट तर माझ्यासाठी आणि विल्यमसाठी तिखट करी बनवते. सर्वांसाठी वेगवेगळ्याप्रकराची करी बनवणे कठीण आहे. मुलांना कमी तिखट, विल्यमला थोडी फार तिखट तर मला खूप तिखट करी बनवणे खूपच त्रासदायक असल्याची माहिती दिली होती.

खाण्याच्या बाबतीत दोन्ही युवराज हे वडील विल्यम यांच्यावर गेले असून युवराज्ञी शार्लोट ही आईसारखी असल्याचे यावेळी ब्रिटनच्या राजघराण्यातील दांपत्याने सांगितले. आईप्रमाणे तिखट खायला युवराज्ञी शार्लोटला आवडते तर वडिलांप्रमाणे दोन्ही मुले कमी तिखट खाणे पसंत करतात, असे विल्यम यांनी स्पष्ट केले.

१४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान ब्रिटनच्या राजघराण्यातील हे दांपत्य पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तानकडून केट आणि विल्यम यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. दरम्यान ही बातमी समोर आल्यानंतर इंटनरनेटवर अनेक भारतीयांनी या दोघांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment