बावनकुळेंच्या पत्नीने दाखल केला अपक्ष अर्ज


नागपूर – भाजपमधील अनेक निष्ठावंताची उमेदवारी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात झालेल्या नेत्याच्या प्रचंड इनकमिंगमुळे गेली आहे. खडसे, तावडेंपासून ते अनेक विद्यमान आमदारांचाही यात समावेश आहे. पक्षाने राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळ ठेवले असून, यादीची वाट बघून थकलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. पण त्याआधी उमेदवारीवरून चांगलेच नाट्य रंगले आहे. भाजपाने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना डच्चू दिला आहे. भाजपाने सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही नागपूरमधील कामठी मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय बराच ताणून धरला होता.

खडसे यांच्याऐवजी ऐनवेळी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण त्याबाबतही लवकर निर्णय होत नसल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला आहे. ज्योती बावनकुळे यांचा अर्ज दाखल झाला असली, तरी कामठी मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Leave a Comment