सचिन पिळगांवकरांना विश्वासू नोकरानेच घतला गंडा


मुंबई – आपल्याच विश्वासू नोकराने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते,गायक आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सचिन यांच्या कार्यालयातून त्यांची आणि त्यांचे वडिल दिवंगत शरद पिळगावकर यांना मिळालेली सन्मानचिन्ह चोरीला गेल्याचे समोर आले होते. ही चोरी दुसऱ्या-तिसऱ्या कोणी न करता त्यांच्या विश्वासू नोकराने केल्याचे उघड झाले आहे. या नोकराचे नाव अमृत सोळंकी (३५) असे असून सांताक्रूझ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील सचिन पिळगावकर यांचे दिवंगत वडिल शरद पिळगावकर हे एक नावजलेले चित्रपट निर्माते होते. अनेकदा उत्कृष्ट चित्रपट निर्माते म्हणून त्यांना गौरवण्यात आले होते. सचिन यांच्या जुहू येथील कार्यालयात त्यांनी त्यांची आणि त्यांच्या वडिलांची कमावलेली सन्मानचिन्हे जतन करुन ठेवली होती. सचिन यांनी काही दिवसांपूर्वी कार्यालयाच्या डागडुजीचे काम सुरु केले होते. त्यांची पत्नी सुप्रिया ते पाहण्यासाठी तेथे पोहोचल्या होत्या. दरम्यान त्यांना तेथे सन्मानचिन्हे दिसली नाहीत. याबाबत त्यांनी त्यांचा नोकर अमृत सोळंकी याला विचारले. सोळंकी याने ज्याला उत्तर देताना कार्यालयाचे काम सुरु असताना सन्मानचिन्हे धुळीने खराब होऊ नये म्हणून गोणीत भरुन ठेवली असल्याचे सांगितले. पण ती सध्या कुठे गेली हे माहित नसल्याचे सोळंकीने सांगितले.

सुप्रिया पिळगावकर यांनी यानंतर घडलेला प्रकार सचिन यांच्या कानावर घातला. सचिन यांनी त्वरीत सांताक्रूझ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. सचिन आणि सुप्रिया यांचा नोकर अमृतवर संशय असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतेले. अमृतने ही सन्मानचिन्हे केवळ ४०० ते ५०० रुपयांना विकली असल्याची कबुली दिली. वडिलांनी एवढी वर्षे मेहनत घेऊन कमावलेली सन्माचिन्ह कवडीमोल पैशासाठी विकी गेल्यामुळे सचिन यांना धक्का बसला आहे.

Leave a Comment