वरळीतून आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणूक लढवणार अभिजीत बिचुकले


मुंबई : घोषणा केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आलेला अभिजीत बिचुकले उतरला आहे. विशेष म्हणजे अभिजीत बिचुकलेने यंदा आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून बिचुकले निवडणूक लढवणार आहे.

अभिजित बिचुकले यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. यावर उत्तर देताना ते म्हणाले, सध्यातरी माझ्याकडे 288 जागा लढवण्यासाठी तेवढा वेळ नाही. पण दोन्ही राजे जे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेसाठी पाठवा, असे बिचुकलेने म्हटले होते.

साताऱ्यातील अभिजीत बिचुकले हे फेमस व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील स्पर्धक असून अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

Leave a Comment