वयाच्या ९५ व्या वर्षीही कार्टर गरिबांसाठी बांधताहेत घरे


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी मंगळवारी वयाची ९५ वर्षे पूर्ण केली असून सर्वाधिक वयाचे जीवित राष्ट्राध्यक्ष असे नवे रेकॉर्ड नोंदविले. १९७७ ते १९८१ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलेले कार्टर आज वयाच्या ९५ व्या वर्षीही सक्रीय असून न थकता अजुनी गरीब लोकांसाठी घरबांधणी कामात मग्न आहेत. गरीब लोकांचे आयुष्य सुगम व्हावे यासाठी पत्नी रोझलीन सह त्यांनी अमेरिका, आशिया, आफ्रिकेतील अनेक देशात गेली ३६ वर्षे हे काम सुरु ठेवले असून लाखो गरिबांना हक्काचा निवारा दिला आहे. कार्टर पुढील आठवड्यात नॅशविले येथे होत असलेल्या मानवता आश्रय या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.


जिमी कार्टर १ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक वयाचे जीवित राष्ट्राध्यक्ष बनले असून त्यापूर्वी हा विक्रम माजी राष्ट्रपती जॉर्ज एच बुश यांच्या नावावर होता. बुश यांचे गेल्या नोव्हेंबर मध्ये वयाच्या ९४ वर्षे आणि १४१ व्या दिवशी निधन झाले. जिमी कार्टर यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी फिजिशियन नसलेल्या एका छोट्या शहरात नुकतेच हेल्थ क्लिनिक सुरु केले असून त्याच्या गावातील नागरिकांना वीज मिळावी म्हणून स्वखर्चाने सोलर पॅनल सह घरे बांधून दिली आहेत.

२०१६ मध्ये कार्टर यांना कॅन्सरने ग्रासले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते त्याकाळात सुद्धा त्यांनी गरिबांसाठी घरे उभारणीचे काम सुरु ठेवले होते. त्यासाठी मदत मिळावी म्हणून ते स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत असत. कार्टर आता कर्करोगमुक्त झाले असून घर बांधणीचे काम जोमाने करत आहेत.

Leave a Comment