पार्लेच्या रोलाकोला कॅन्डीची धमाकेदार वापसी


बिस्किटे आणि कन्फेक्शनरी मधील देशातील अग्रणी पार्ले त्यांच्या जुन्याच रोलाकोला कॅन्डीचे पुन्हा एकदा धमाकेदार लाँचिंग करून नव्या उमेदीने भारतीय बाजारात उतरली आहे. या कॅन्डीच्या विक्रीतून वर्षात १०० कोटीच्या उलाढालीचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ग्राहकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे १३ वर्षापूर्वी भारतीय बाजारात विक्री थांबविण्यात आलेल्या या कॅन्डीचे पुनरागमन झाले आहे.

पार्लेचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव यासंदर्भात म्हणाले, आम्ही सोशल मिडिया इंटरअॅक्शनचा वापर व्यासपीठाप्रमाणे करून ग्राहकांच्या मागणीच्या आधारावर रोलाकोला ब्रांड पुन्हा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरच्या मध्याला इंदोर येथील प्रकल्पाची क्षमता वाढवून उत्पादन सुरु केले असून पहिल्या सहा महिन्यात देशातील ५ लाख स्टोर्स मध्ये रोलाकोला मिळू लागेल. सोशल मीडियावर एका युजरने ट्विट करून रोलाकोला कॅन्डी परत बाजारात आणावी अशी विनंती केली होती त्यावर कंपनीने १०,००० रीट्विट आले तर त्या संदर्भात निर्णय घेण्याचा विचार केला होता. विशेष म्हणजे या ट्विट वर ७ लाख ११ हजार प्रतिक्रिया आल्या आणि कंपनीने रोलाकोला पुन्हा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला.

पार्ले उत्पादनाच्या बाजारात या कॅन्डीचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. येत्या १ महिन्यात २०० टन रोलाकोला विकण्याचे उदिष्ट ठेवले गेले असून कन्फेक्शनरी व्हर्टिकल पार्लेच्या व्यवसायात तिचे १३ ते १५ टक्के योगदान आहे. भारतात या कॅन्डीची विक्री २००६ मध्ये बंद केली गेली होती तरी आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या बाजारात तिची विक्री सुरु होती.

Leave a Comment