खुद्द रावणाने केली होती शंकरी देवीची स्थापना


श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून २५० किमी वर असलेले त्रिकोन्माली येथील श्री शंकरीदेवी मंदिर हिंदू, त्यातही तमिळ भाषिक हिंदूंसाठी आस्थेचे केंद्र आहे. सध्या सुरु असलेल्या नवरात्रात या मंदिरात हिंदू भाविक गर्दी करत आहेत. असे सांगतात की खुद्द रावणाने या देवीची स्थापना केली आहे. एका खडकावर असलेल्या या मंदिराला शांतीचा स्वर्ग मानले जाते. चैत्री आणि शारदीय नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा होतो.

या ठिकाणी यज्ञात उडी घेऊन प्राण त्यागलेल्या सतीचे ओटीपोट पडले होते असे मानले जाते. त्यामुळे सतीची जी ५१ शक्तीपीठे मानली जातात त्यातील हे एक आहे. काही ग्रंथात या ठिकाणी सतीचा कंठ आणि पैंजण पडले होते असे उल्लेख येतात. रावणाने या देवीचे स्थापना केली असून येथे एक शिवमंदिरही आहे. रावण महान शिवभक्त होता. हे शक्ती इंद्राक्षी आणि भैरव राक्षसेश्वर यांचे स्थान मानले जाते. येथील शिवमंदिराला त्रिकोनेश्वर किंवा कोनेश्वरम असे म्हटले जाते.


आदि शंकराचार्यांनी निश्चित केलेल्या १८ महाशक्तीपिठात या स्थळाचा समावेश आहे. इतिहासात या मंदिरावर अनेकदा हल्ले झाल्याचे उल्लेख आहेत मात्र दरवेळी देवीची मूर्ती सुरक्षित राहिली आहे. हल्ल्यांमुळे मंदिराचे स्वरूप मात्र बदलले आहे. चोल पल्लव राजांनी या मंदिराचे खूप काम केल्याचे सांगितले जाते. येथे भव्य मंदिर त्यांनी बांधले पण १७ व्या शतकात पोर्तुगीज आक्रमणात ते नष्ट केले गेले. या मंदिराचा तेव्हा फक्त एक स्तंभ शिल्लक राहिला होता. चोल राजा कुलकोरण याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १९५२ मध्ये श्रीलंकेत राहणाऱ्या तमिळ हिंदुनी या मंदिराला सध्याचे स्वरूप दिले असे सांगितले जाते.

Leave a Comment