आपला आहार आणि अंगगंध

food
काही लोक समोर आले की, त्यांच्या श्‍वासातला दुर्गंध ताबडतोब आपल्याला जाणवतो आणि अशा माणसाचा सहवास असह्य होऊन जातो. काही लोकांच्या शरीरालाच असा दुर्गंध येतो. स्नान चांगले नाही केल्यास शरीराला वास येतो, परंतु काही लोक स्नान करून सुद्धा शरीराचा दुर्गंध घालवू शकत नाहीत. कारण अंगाचा वास निव्वळ त्वचेवर अवलंबून नसतो तर तो त्वचेच्या आत शरीरात चालणार्‍या काही प्रक्रियावर अवलंबून असतो. आपण काय खातो आणि किती खातो यावर आपल्या श्‍वासाचा आणि शरीराचा गंधही अवलंबून असतो.

विशेषत: आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट झाले नाही तर त्या अपचनातून जे अशुद्ध आणि विषारी द्रव्ये निर्माण होतात त्या द्रव्यांमुळे श्‍वासाला दुर्गंध येतो आणि शरीराचा सुद्धा वास येतो. शास्त्रज्ञांचे तर असेही मत आहे की, लोक शरीराचा दुर्गंध झाकण्यासाठी ज्या सुगंधी द्रव्यांचा वापर करतात त्या सुगंधी द्रव्यांचा अतिरेक झाला तर त्यातूनही दुर्गंधच निर्माण होत असतो. म्हणजे लोक शरीराला सुगंध यावा म्हणून जे काही उद्योग करतात त्यातून अंतिमत: दुर्गंधच उद्भवतो. ज्या खाद्यपदार्थांमुळे हे दुर्गंध उद्भवतात त्यात रेड मीट या प्रकारचे मांस प्रामुख्याने समाविष्ट असते. अशा प्रकारचे मांस शरीरात गेल्यानंतर ते अनेक प्रकारची द्रव्ये निर्माण करते आणि ती द्रव्ये रक्त प्रवाहात मिसळतात. त्याच बरोबर ती मोठ्या आतड्यातही जातात आणि परिणामी घामातून त्वचेवर येतात, असे लोक जवळ आले की भपकारा येतो.

भरपूर लसणाचा वापर केलेल्या मसाल्यांमुळे श्‍वासाची दुर्गंधी वाढतेच, परंतु लसूण खाल्ल्यानंतर शरीरात निर्माण होणार्‍या प्रक्रियांमध्ये लसणाचे पचन होत असताना जे वायू निर्माण होतात त्यांच्यामुळे शरीराचाही दुर्गंध वाढतो. काही अन्न द्रव्यांच्या खाण्यानंतर शरीरामध्ये हायड्रोयन, कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन हे वायू निर्माण होऊन त्यांच्यामुळेही श्‍वास आणि शरीर यांना दुर्गंध येतो. प्रथिनांचे भरपूर प्रमाण असणारे दुग्धजन्य पदार्थ हे सुद्धा लसणासारखीच प्रक्रिया करत असतात. कॉफी तसेच भाजलेले आणि तळलेले पदार्थ आणि अंड्यासारखे खाद्य पदार्थ हेही दुर्गंधास कारणीभूत ठरतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment