चंद्रकांत पाटलांना जड जाणार विधानसभा निवडणूक


पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असतानाच त्यांना विरोध सुरु झाला होता. पण चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला. दरम्यान अजूनही चंद्रकांत पाटील यांना होत असलेला विरोध कायम असून त्यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

एक पोस्टर कोथरुडमधील एसएनडीटी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलावर लावण्यात आला आहे. नोटाला १०० टक्के मतदान देणार असल्याचे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे. नेमके कोणी हा पोस्टर लावलं आहे हे कळू शकले नाही. कोथरुडमध्ये काही दिवसांपुर्वी दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे अशी पोस्टरबाजी करण्यात आली होती.

कोथरुडमधील लढत या फलकबाजीमुळे रंगतदार होईल असे चित्र आहे. या मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या असून त्या पुन्हा निवडणुक लढविण्यास इच्छुक होत्या. पण चंद्रकांत पाटील यांचे नाव ऐनवेळी पुढे आल्याने, त्या नाराज असल्याची चर्चा होती. पक्षाच्या मेळाव्यात बोलताना बुधवारी माझ्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल, मी गद्दारी करणार नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

Leave a Comment