खळ्ळखट्याक करणारा मनसैनिकाने सोडली मनसेची साथ


मुंबई – मनसेला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेतला. एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केली असतानाच दुसरीकडे नांदगावकर यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.


नितीन नांदगावकर हे त्यांच्या खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे चर्चेत आले होते. आपल्या माध्यमातून अनेकांना त्यांनी न्यायही मिळवून दिला होता. त्यांनी नुकतेच मुंबईतील टॅक्सी चालकांविरोधात आंदोलन पुकारले होते. त्यांनी टॅक्सींमध्ये बटन लावून प्रवाशांच्या होणाऱ्या फसवणुकीबद्दल आवाज उठवला होता. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर झालेल्या त्रासानंतरही त्यांनी टॅक्सीचालकांना इशारा दिला होता. तसेच आपल्या दरबाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न केला होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे नांदगावकर म्हणाले. तसेच आपण उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर भगवा फडकवणार आहोत. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून आता आपले काम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेने यापूर्वी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. 100 जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसेच्या आलेल्या उमेदवारांच्या दोन याद्यांमध्ये नांदगावकर यांना वगळण्यात आल्यामुळेच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Leave a Comment