भारताचा डाव 502 वर घोषित, तर दिवसाखेर आफ्रिका 3 बाद 39 धावा


विशाखापट्टनम – भारतीय फलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केलेल्या धमाकेदार फलंदाजीनंतर भारतीय फिरकी गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या दिवसअखेर अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. भारताने पहिला डाव ७ बाद ५०२ वर घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी कंबरडे मोडले. इडन मार्क्रम (५) आणि थेनीस डी ब्रुन (४) यांना अश्विनने माघारी धाडले. तर नाईट वॉचमन डेन पीटला जाडेजाने शून्यावर तंबूत पाठवल्यामुळे भारताने सामन्यावर पकड मिळवली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने सलामीवीर मयांक अग्रवालचे द्विशतक (२१५) आणि रोहित शर्माचे दीडशतक (१७६) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर धावांचा रतीब रचला. भारतीय फलंदाजांनी पहिल्या दिवशी बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर दुसऱ्या दिवशीही आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी आफ्रिकन गोलंदाजांवर प्रहार करत दमदार खेळी केली.

३७१ चेंडूत मयांक अग्रवालने २१५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याने पहिले द्विशतक झळकावले. तर २४४ चेंडूत रोहितने १७६ धावा केल्या. विशेष म्हणजे दोघांनीही आपल्या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकार खेचले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. पण अखेरीस केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत होऊन माघारी परतला.

दरम्यान, मयांकने रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर अन्य फलंदाजांना हाताशी धरत फटकेबाजी सुरु ठेवली. कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावणाऱ्या मयांकने या शतकी खेळीचे द्विशतकी खेळीत रुपांतर केले. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी पण पहिल्या डावात थोडीशी निराशा केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा हे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे भारताने ७ बाद ५०२ या धावसंख्येवर डाव घोषित केला.

Leave a Comment