ह्युंदाईची कमर्शियल फ्लाइंग कार मोहीम


आगामी काही वर्षात वाहतुकीची सर्व गणिते बदलणार हे लक्षात घेऊन द. कोरियाची दिग्गज कार उत्पादक कंपनी भविष्याचा वेध घेऊ लागली आहे. ह्युंदाई मोटर्सने कमर्शियल फ्लाईंग कार बनविण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी नवीन अर्बन एअर मोबिलिटी डिव्हिजन स्थापन केली आहे. अन्य बड्या कंपन्या फ्लाईंग कार क्षेत्रात उतरल्या आहेतच पण ह्युंदाईने त्यापुढचे पाउल टाकत व्यावसायिक वापराची उडती कार बनविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

ह्युंदाईने या नव्या प्रोजेक्टसाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अनुभवी एरोनॉटिक्स इंजिनीअर डॉ. जयोन शीन याच्यावर ही जबाबदारी दिली आहे. येत्या काही काळात अनेक देशात वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल होणार हे लक्षात घेऊन डॉ. शीन यांच्या मार्गदर्शनाखाली उडती व्यावसायिक वाहने बनविण्याची कंपनीची योजना आहे. डॉ.शीन यांनी नासाच्या एरोनॉटिक्स रिसर्च मिशन डायरेक्टरेट मिशनचे प्रमुख म्हणून काम केले आहे. सुपरसोनिक एक्स प्लेन, युएस ट्राफिक मॅनेजमेंट, अर्बन मोबिलिटी या सारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या कामाचा त्यांना अनुभव आहे.

जगभरात वाहतूक कोंडी ही समस्या उग्र रूप धारण करत आहे आणि तिच्यावर सध्या तरी कोणताही मार्ग मिळालेला नाही. अश्यावेळी उडती वाहने हा या समस्येवरचा एक मार्ग असू शकतो. येत्या १० वर्षात त्याचा परिणाम दिसू लागेल. या काळात पेट्रोल डिझेल वाहनांची संख्या कमी होईल आणि त्यामुळे वायू प्रदूषण कमी होईल असे ह्युंदाईचे अधिकारी म्हणाले.

Leave a Comment