व्हाईट हाउस उंदरांमुळे चर्चेत


अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाउस नेहमीच चर्चेत असते पण मंगळवारी ते उंदरांमुळे चर्चेत आले. झाले असे की मंगळवारी पत्रकार परिषद सुरु असताना अचानक एनबीसी न्यूजच्या व्हाईट हाउस प्रतिनिधीच्या मांडीवर छतावरून एक उंदीर अचानक पडला आणि काही कळण्यापूर्वीच या उंदराने चपळाई करून पलायन केले. पीटर अलेक्झांडर यांच्या मांडीवर हा उंदीर सकाळी पावणे आकाराच्या सुमारास पडला आणि एकदम एकच गोंधळ उडाला. कुणी उंदराचे फोटो काढू लागले, कुणी उंदराला पकडण्याचा मागे लागले तर कुणी नुसत्याच किंकाळ्या फोडल्या. या संदर्भातले वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे.

हे वृत्त आले मात्र सोशल मीडियावर उंदीर या विषयावरील पोस्टचा महापूर आला आहे. व्हाईट हाउसची अनेकांनी चांगलीच टिंगल केली आहे. गेल्या वर्षीही व्हाईट हाउसच्या लॉन वर फिरताना उंदीर दिसले होते. व्हाईट हाउस आणि लाफायेर स्क्वायरची देखभाल नॅशनल पार्क सर्व्हिस कडून केली जाते आणि दर आठवड्याला प्रचंड संख्येने उंदीर पकडले जातात तरी या जागेत उंदरांचा उपद्रव कायम आहे. कोलंबिया आरोग्य विभागाने शहरातील उंदीर समस्या लक्षात घेऊन या वर्षी जादा ९०६००० डॉलर्सची तरतूद केली आहे असेही समजते.

Leave a Comment