ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी या कंपन्या आल्या एकत्र

देशातील तंत्रज्ञानातील बदलाबरोबरच ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी दररोज नवनवीन पध्दती शोधत आहेत. दररोज लाखो रूपये लोकांच्या खात्यातून उडवले जात आहेत. या प्रकारच्या घटनांवर रोख लावण्यासाठी मेक माय ट्रिप ग्रुप, पेटीएम, ओयो, स्विगी, झॉमेटो आणि उबेर या कंपन्या एकत्र आल्या आहेत.

रिपोर्टनुसार, या कंपन्यांनी सायबर क्राइम बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबरोबर बैठक केली. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी या कंपन्यांनी आरबीआयशी संवाद साधला.

हॅकर्स खोटे टोल-फ्री नंबर आणि सिरियल बँक अकाउंट नंबर तयार करून हॅकिंग करतात. याचबरोबर या कंपन्यांनी 4 हजार सिम कार्ड, 350 ते 400 बँक अकाउंट नंबर आरबीआय, एसबीआय आणि टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. या नंबर आणि अकाउंटवरून सर्वाधिक फ्रॉड केले जात आहेत.

मेक माय ट्रिपपासून ते उबेरपर्यंत सर्वांनी सायबर क्राइम रोखण्यासाठी सर्च इंजिन कंपनी गुगलकडे मदत मागितली आहे.  हॅकर्स गुगलच्या फिचरचा वापर करून खोटे टोल फ्री नंबर सर्च लिस्टमध्ये सर्वात वरती ठेवतात. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होते. याशिवाय काही हॅकर्स बँकेची खोटी साइट बनवून देखील ग्राहकांची फसवणूक करतात.

Leave a Comment