पहिली कसोटी ; उर्वरित दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द


विशाखापट्टणम – विशाखापट्टणमच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला पावसाचा फटका बसला असून भारतीय फलंदाजांनी चहापानाच्या सत्रापर्यंत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. भारताने पहिल्या दिवसाअखेरीस सलामीवीर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि मयांक अग्रवालने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारली आहे. खेळ चहापानाआधी अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला. यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचांनी उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द केला.

आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत चहापानापर्यंत आपले वर्चस्व कायम राखले. चहापानापर्यंत १७४ चेंडूत रोहित शर्माने नाबाद ११५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. भारतीय सलामीवीरांनी पहिल्या सत्रानंतर सामन्यावरची आपली पकड अधिक घट्ट केली. दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत खोऱ्याने धावा काढणे सुरुच ठेवले. त्याआधी, लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात स्थान मिळालेल्या रोहित शर्माने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी उपहारापर्यंत ९१ धावांची भागीदारी करत भारताचे पारडे जड ठेवले.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. सराव सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्यामुळे आफ्रिकेच्या गोलंदाजांचा रोहित कसा सामना करतो हे सर्वांना पहायचे होते. पण रोहितने संयमाने फलंदाजी करत खेळपट्टीवर स्थिर होण्याला वेळ दिला. यानंतर जम बसल्यानंतर रोहितने आपल्या ठेवणीतले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने मयांक अग्रवालनेही त्याला चांगली साथ दिली. आफ्रिकेच्या गोलंदाजांचे भारताची जोडी फोडण्याचे प्रयत्न अपूरे पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचे गोलंदाज भारताची जोडी फोडण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment