इस्रोच्या वैज्ञानिकांनी सोडली नाही विक्रम लँडरशी संपर्काची आशा


बंगळुरु – विक्रम लँडरशी संपर्काची आशा इस्रोच्या वैज्ञानिकांनी सोडलेली नाही. विक्रम लँडरशी संपर्क चंद्रावर हार्डलँडिंग झाल्यानंतर तुटला होता. यानंतर लँडरशी सतत १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तो अयशस्वी ठरला. इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता अजूनही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे संकेत दिले आहेत.

विक्रम लँडरचा 7 सप्टेंबरला अखेरच्या टप्प्यात इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. चंद्रावर आता रात्र असल्यामुळे विक्रमशी संपर्क करणे शक्य नसून आम्ही दिवस सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करु शकतो. लँडिग साईटच्या जागी आता रात्र आहे. इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी तिथे सूर्यप्रकाश नाही असे सांगितले. विक्रम लँडर आणि त्यातील प्रग्यान रोव्हरची रचना चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

कुठल्या दिशेला संपर्क साधण्याचा अँटिना आहे ते ही ठाऊक नाही. तसेच, ही उपकरणे चंद्रावर रात्रीच्या थंड वातावरणात तग धरण्याची शक्यता कमी आहे. एवढ्या दिवसांनी संपर्क होणे कठीण आहे. पण प्रयत्न करण्यात काही चुकीचे नसल्याचे इस्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ठरवलेल्या वेगापेक्षा जास्तवेगात लँडर चंद्रावर उतरला होता. त्यामुळे आतमधील उपकरणांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असल्यामुळे लँडरशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता खूप धूसर आहे.

विक्रम लँडरचे फोटो नासाच्या ऑर्बिटरलाही मिळवता आले नव्हते. ज्यावेळी ऑर्बिटर तिथून गेला तेव्हा संधीप्रकाश होता. त्यामुळे सावल्यांखाली लँडर झाकला गेल्याची शक्यता आहे. आता १४ ऑक्टोंबरला नासाचा ऑर्बिटर तिथून पुन्हा जाणार आहे. त्यावेळी लख्ख प्रकाश असल्यामुळे विक्रमचे फोटो मिळण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment