ऐतिहासिक महामाया मंदिर- नवरात्रीत उजळले दीपकलश


छतीसगढ़ राज्यात ३६ प्रमुख देवी मंदिरे आहेत. हैहयवंशी राजांनी येथे ३६ गड बांधले तेव्हाच ३६ देवी मंदिरे बांधली गेली असे सांगतात. या प्रत्येक मंदिराचे काही वैशिष्ट आहे मात्र त्यातही खास आहे ते रायपूर मधले महामाया मंदिर. असे सांगतात की ५ हजार वर्षापूर्वी मोरध्वज राजाने या मंदिरात देवीची प्रतिष्ठापना केली. देवीने स्वतः राजाला तिची स्थापना कर असे सांगितले होते असे म्हणतात.

भाविक देव दर्शनाला जातात आणि बऱ्याच ठिकाणी इच्छापूर्ती साठी नवस करतात. या मंदिरात इच्छा पूर्ती झाली तर दीप कलश देण्याची प्रथा असून दोन्ही नवरात्रात रात्रंदिवस या दीप कलशांची देखभाल केली जाते त्यासाठी वेगळे सेवेकरी येथे तैनात असतात. विशेष म्हणजे तीन पिढ्यातील लोक येथे येऊन ही सेवा करतात.


गेल्या २५ वर्षात असे दिपकलश देण्यात प्रचंड वाढ झाली आहे. २५ वर्षापूर्वी ५०० ते १००० दिवे दिले जात ती संख्या आता ८ हजारावर गेली आहे. त्याची देखभाल यथायोग्य व्हावी म्हणून खास कक्ष बनविले गेले आहेत. त्यांची रखवाली करण्यासाठी यंदा भाठागाव येथून १५० सेवेकरी आले असून ५० -५० च्या संखेने ते रात्रंदिवस भाविकांनी अर्पण केलेल्या या दीपांची काळजी घेत आहेत. दिव्यातील तेल पाहणे, वाती सारख्या करणे, पाउस वाऱ्याने ते विझणार नाहीत याची काळजी घेणे आणि नवरात्रीनंतर त्यांचे योग्य प्रकारे विसर्जन करणे अशी कामे हे सेवेकरी कोणताही मोबदला न घेता पार पडतात.

घटस्थापनेच्या एक दिवस अगोदर ज्योत कक्ष स्वच्छ केले जातात मग क्रमाक्रमाने तेथे दीप प्रज्वलित केले जातात. प्रत्येक कक्षात १ ते दीड हजार दिवे असतात आणि त्यामुळे तेथील तापमान प्रचंड वाढते. सर्वसामान्य माणूस तेथे थोड्या वेळासाठी सुद्धा थांबू शकत नाही मात्र हे सेवेकरी ८ -८ तास तेथे थांबून दिव्यांची काळजी घेतात.

Leave a Comment