आई बनल्यावर या खेळाडूने तोडले उसेन बोल्टचे रेकॉर्ड


महिला खेळाडूच्या बाबतीत अनेकदा आपण त्या आई बनल्या की त्यांचे करियर थांबल्यासारखे होते हे पाहतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र अमेरिकेची धावपटू एलियन फेलिक्स हिला मात्र असल्या अडचणी थांबवू शकत नाहीत हे तिने नुकतेच सिध्द केले आहे आणि यापूर्वी कधीच घडले नाही ते करून दाखविले आहे.

एलियनने वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिप मध्ये १२ गोल्ड मिळविणारी पहिली खेळाडू बनण्याची कामगिरी बजावली आहेच पण बाळाला जन्म दिल्यावर १० महिन्यात तिने हे रेकॉर्ड नोंदविले आहे. विशेष म्हणजे जमेकाचा जागतिक कीर्तीचा धावपटू उसेन बोल्ट यालाही तिने मागे टाकले आहे.

३३ वर्षीय एलियनने दोहा मध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिप मध्ये मंगळवारी रिले प्रकारात गोल्ड मेडल मिळविले. वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिप मध्ये तिने आता १२ गोल्ड मेडल मिळवून नवीन रेकॉर्ड कायम केले. पृथ्वीवरील सर्वात वेगवान धावपटू उसेन याच्या नावावर ११ गोल्ड आहेत. एलियनने १८ नोव्हेंबर २०१८ मध्ये बाळाला जन्म दिला असून पुन्हा मैदानावर उतरून तिने तिचा दम दाखविला आहे.

तिचे ओव्हरऑल रेकॉर्ड पहिले तर तिने ऑलिम्पिक मध्ये सहा गोल्डसह एकूण ९ पदके जिंकली आहेत. त्यात ३ सिल्वर मेडल आहेत. वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये तिने एकूण १७ पदके जिंकली असून त्यात १२ गोल्ड, ३ सिल्व्हर आणि २ ब्राँझ मेडल्स आहेत.

Leave a Comment