रक्तबीज राक्षसाचा नाश करून येथे स्थिरावली देवी बिजासनी


मध्यप्रदेशची राजधानी भोपाल पासून ७५ किमी असलेले दुर्गा धाम येथे पार्वतीचे रूप असलेली देवी बिजासनी नावाने विराजित आहे. हे मंदिर अतिप्राचीन असून उंच डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी १ हजार पायऱ्या चढाव्या लागतात. इसवी सन ११०० मध्ये तत्कालीन गौड राजांनी गीन्नोरगढ किल्ला बांधला तेव्हाच हे मंदिर बांधले असे सांगितले जाते. हे ठिकाण विजयासन धाम या नावानेही ओळखले जाते.

या ठिकाणचे विशेष म्हणजे येथे देवीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगतात. तिची सिंदूरच्या सहाय्याने अतिशय सुंदर सजावट केली जाते. येथेच भैरव, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांच्याही मूर्ती आहेत.


असे सांगतात की रक्तबीज नावाचा एक राक्षस अति उपद्रवी झाला होता आणि त्याने तपस्या करून वर मिळविला होता. त्यामुळे त्याच्या रक्ताच्या थेंबापासून तो पुन्हा जिवंत होऊ शकत असे. त्रासलेल्या देव देवतांनी या रक्तबीजाला ठार कर अशी दुर्गेची प्रार्थना केली तेव्हा पार्वतीरूप दुर्गा या ठिकाणी रक्तबीज राक्षसाचा नाश करण्यासाठी प्रकट झाली आणि तिने त्याचा वध केला. या युद्धाच्या काही खुणा आजही येथे पाहायला मिळतात.

प्रसिद्ध संत भद्रानंद स्वामी यांनी येथे कठोर तपस्या केली होती. त्यानीच येथे नल योगिनीची स्थापना करून या क्षेत्राला सिध्द शक्तीपीठ बनविले. आजही येथे लाखो भाविक तपस्या करण्यासाठी येतात. नवस बोलतात. येथे अनेक तरुण योग्य जोडीदार मिळावा म्हणून नवस करतात आणि त्याची इच्छा पूर्ण होते असाही विश्वास आहे. नवरात्रीत येथे मोठा उत्सव होतो आणि या काळात गर्दी खूप असते.

Leave a Comment