आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजितदादा


राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या युतीची आज प्रत्यक्ष घोषणा होत असून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असतानाचा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधांत मजबूत उमेदवार देणार आहोत असे स्पष्ट केले आहे.

शिवसेना भाजपा युती होणार हे निश्चित असल्याचे सांगितले जात असतानाच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून निवडणूक मैदानात उतरत असल्याचे जाहीर केले आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक मैदानात उतरणारे आदित्य पहिले ठाकरे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना नेते संजय राउत यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आदित्य यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये अशी विनंती केली होती. याचाच अर्थ शिवसेनेचा आदित्य यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न असेल.

मात्र अजितदादा पवार यांनी २ ऑक्टोबरला आमची यादी जाहीर होईल असे सांगून आदित्य यांच्याविरोधात देण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या नावावर सर्व घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. अजितदादा म्हणाले आमच्या पक्षातून अन्य पक्षात लोक जात आहेत तसेच अन्य पक्षातून आमच्या पक्षातही येत आहेत. थोडे थांबा. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली की सर्व चित्र स्पष्ट होईल. सुरवात त्यांनी केली आहे, शेवट आम्ही करू.

Leave a Comment