विक्कीने प्रथम नाकारली होती उरीमधील भूमिका


उरी द सर्जिकल स्ट्राईक मधील ज्या मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेमुळे बॉलीवूड कलाकार विक्की कौशल एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला त्या भूमिकेसाठी प्रथम विकीने नकार दिला होता असे त्याने एका फिल्म फेस्टिव्हल मध्ये घेतल्या गेलेल्या मुलाखतीत सांगितले.

उरी या वर्षातील सर्वात यशस्वी फिल्म ठरली असून तिने तिकीट बारीवर फारच चांगला व्यवसाय केला आहे. विक्की सांगतो, जेव्हा त्याने पटकथा वाचली तेव्हा ही भूमिका करायची नाही असेच त्याने ठरविले होते. एकतर त्यात अनेक प्रकारची तांत्रिक माहिती होती, शिवाय लष्करी कथा आणि वेगवेगळया भाषा होत्या.. त्यामुळे नुसती पटकथा वाचणेही त्रासदायक झाले होते. शिवाय त्याने राझी मध्ये पाकिस्तानी मेजरचा रोल केला होता त्याला काही तास उलटले होते आणि त्यात या रोलच्या बरोब्बर विरुद्ध भूमिका लगेच करायची त्याची मानसिक तयारी नव्हती.

विक्की सांगतो माझे वडील शाम कौशल यांनीही ही पटकथा वाचली. ते म्हणाले, हा रोल तू केला नाहीस तर ती तुझ्या आयुष्यातील मोठी चूक ठरेल. वडील असे म्हटल्याने विक्कीने पुन्हा एकदा पटकथा वाचून काढली आणि भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

जानेवारी २०१९ मध्ये रीलीज झालेल्या उरीने अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक यश मिळविले. इतके की, २६ जुलै रोजी ती पुन्हा ५०० स्कीनवर रिलीज केली गेली. आदित्य धर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये खर्च केला गेला होता आणि जाहिरातीवर ७ कोटी खर्च केले गेले मात्र या चित्रपटाने २४३ कोटींचा व्यवसाय करून अभूतपूर्व यश मिळविले.

Leave a Comment