‘महाग झाला आहे तर मग कमी खा कांदा’; भाजप मंत्र्याचा सल्ला


कांद्याचे दर देशात गगनाला भिडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर कांद्याचा विषय उत्तर भारतामध्ये चांगलाच तापला आहे. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील आरोग्य मंत्र्यांनी आता कांदा महाग झाला आहे तर कमी कांदा खा, असा अजब सल्ला सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. त्यांना कांद्याच्या दरासंदर्भात एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता हा सल्ला त्यांनी दिला.

रविवारी हरदोई येथील एका रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री अतुल गर्ग हे गेले होते. त्यांनी त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. एका पत्रकाराने या चर्चेदरम्यान गर्ग यांना, कांद्याचे दर वाढत असून यासंदर्भात तुमचे काय म्हणणे आहे असा सवाल केला.

यासंदर्भातील वृत्त ‘द टेलीग्राफ’ने दिले असून त्यांना दिलेल्या वृत्तानुसार पावसाचा शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होतो असे गर्ग यांनी आधी सांगितले. शेतमाल जास्त पाऊस पडल्यास खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच शेतमालाचे दर वाढतात किंवा कमी होतात. जेवणाला चव येण्यासाठी वापरण्यात येणारा कांदा हा जास्तीत जास्त ५० ते १०० ग्राम एवढाच खायला हवा असे मला वाटत असल्यामुळे लोकांना मी कमी कांदा खा असाच सल्ला देईन, असे मत गर्ग यांनी नोंदवले.

आपले मत नोंदवल्यानंतर गर्ग मोठ्याने हसतच आपल्या गाडीकडे गेले. गर्ग यांचे उत्तर ऐकून उपस्थित डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही हसू असल्याचे ‘द टेलीग्राफ’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणावर उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांचा अहंकारच या उत्तरामधून दिसून येत आहे अशी टीका केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मंत्र्यांच्या या वर्तवणुकीला पाठिंबा असल्याचे दिसत असल्याचा टोला विरोधी पक्षांनी लगावला आहे.

Leave a Comment