राजस्थानात गोपालक शेतकरी मालामाल


राजस्थानात गेल्या चार पाच वर्षात गाईसंदर्भात गाईंची तस्करी, त्यांचे संरक्षण हे राजकारणाचे मुद्दे ठरले आहेत. मात्र आता निराळ्याच कारणाने या राज्यातील गाई चर्चेत आल्या आहेत. गेल्या काही महिन्यात गाईपासून मिळणाऱ्या उत्पादनाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे येथे गाईचे दुध ४५ ते ४८ रुपये लिटर दराने विकले जात आहे तर गोमुत्रासाठी मात्र लिटरला १३५ ते १४० रुपये दर दिला जात आहे असे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकार गोपालन हा वेगळा विभाग म्हणून जाहीर करावा अश्या विचारात आहे. येथून गोमुत्र निर्यातही केले जात आहे.

राजस्थानात या घडीला ४ हजार गोशाला असून त्यातील १३६३ नोंदणीकृत आहेत. यात दुर्गापूर, जयपूर गोशाला प्रमुख आहेत. आशियातील सर्वात मोठी गोशाला पथमेडा येथे आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोमुत्राचा वापर अनेक औषधात केला जात असून त्यामुळे त्याला प्रचंड मागणी आहे. राज्यात दररोज ताजे गोमुत्र सेवन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून गोशाळेसमोर सकाळीच असे लोक रांगा लावून उभे राहिलेले दिसतात. गोमुत्र सेवनाने मधुमेह, पोटाचे विकार, स्थूलत्व यावर चांगला फायदा होतो त्यामुळे या विकारांवरील औषधात गोमुत्राचा वापर वाढला आहे.

याचा थेट फायदा शेतकरी वर्गाला होत असून ज्या शेतकऱ्यांच्या घरी गाई आहेत ते त्याच्याकडे जमा होणारे गोमुत्र गोशाळेला विकतात आणि गोशालेकडून ते औषध निर्माण उद्योगाला पुरविले जाते आणि त्याची निर्यात केली जाते.

Leave a Comment