वणी सप्तशृंगी गडावर मातेने केला होता महिषासुर वध


देशभरात शारदीय नवरात्र महोत्सव सुरु झाला आहे. महाराष्ट्रात देवीची जी पवित्र साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धी पीठ असलेल्या नाशिक जवळच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर घटस्थापना झाली आहे. भागवत पुराणात महिसासुर राक्षसाचा वध दुर्गेने केल्याचा उल्लेख येतो. या महिषसुराचा वध मातेने या गडावर केला होता असे मानले जाते. या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत तेथे डावीकडे महिषासुराचे छोटे मंदिर असून त्यात रेड्याच्या डोक्याचा पितळी मुखवटा आहे आणि त्याची पूजा केली जाते.

भागवतात देवीची १०८ शक्तीपीठे असल्याचे उल्लेख येतात त्यातील साडेतीन महाराष्ट्रात आहेत. सप्तशृंगी गडाची उंची ४८०० फुट असून देवीच्या मंदिरात ८ फुटी उंचीची आणि १८ भुजा असलेली देवीची मूर्ती आहे. मंदिरात जाण्यासाठी ४७२ पायऱ्या चढाव्या लागतात. येथे चैत्री आणि शारदीय अशी दोन नवरात्रे होतात आणि दोन्हीवेळा देवीचे रूप वेगळे दिसते. चैत्री नवरात्रात ते प्रसन्न दिसते तर शारदीय नवरात्रात ते गंभीर दिसते. या पर्वतावर १०८ कुंडे आहेत तसेच बाजूने सात सुंदर पण लहान डोंगर आहेत. म्हणून या ठिकाणाला सप्तशृंगी म्हटले जाते आणि तेच नाव देवीला दिले गेले आहे. देवीची मूर्ती गुहेत असून त्याला तीन दारे आहेत. त्यांची नावे शक्ती द्वार, सूर्य द्वार आणि चंद्रमा द्वार अशी असून त्या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घेता येते.

महिषासुर राक्षस उन्मत झाला तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी सर्व देवदेवतांनी दुर्गेला प्रार्थना केली. त्यावेळी या गडावर देवी प्रकट झाली व येथेच तिने महिषासुराबरोबर युद्ध करून त्याला ठार केले. देवीला १८ भुजा आहेत त्याचे कारण असे सांगतात की महिषासुराशी लढण्यासाठी शंकर, विष्णू, ब्रह्मदेव यांच्यासह अनेक देवानी त्यांची शस्त्रे देवीला दिली होती. या देवीला ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हटले जाते. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी त्रिगुण स्वरुपात तिची आराधना केली जाते.

याच जागी देवीने महिषासुराला मारले याच्या काही खुणा दिसतात. भोवतीच्या डोंगरातील एका डोंगर विशेष न्याहाळून पहिला तर त्यात मोठा छेद दिसतो. असे मानले जाते देवीने जेव्हा महिषासुराचा वध केला तेव्हा तिने त्रिशूलाचा प्रहार केला व त्यातून हा छेद निर्माण झाला. युद्ध करून दमल्याने देवीने या गुहेत आराम करण्यासाठी मुक्काम केला असे मानले जाते.

Leave a Comment