घराण्याची परंपरा मोडून आदित्य ठाकरे निवडणूक मैदानात


महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना भाजप यांच्यातील जागा वाटपाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी शिवसेनेचे युवा नेते आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यापासूनच ठाकरे निवडणूक लढविणार नाहीत असे जाहीर केले होते आणि त्याप्रमाणे बाळासाहेब कधीच निवडणुकीत उतरले नाहीत तसेच पुढच्या पिढीतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेही कधी निवडणूक रिंगणात उतरले नव्हते. मात्र नव्या पिढीत आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा खंडीत केली अशी चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रा काढून ज्या पद्धतीने आदित्य यांना शिवसेनेचा मुख्य चेहरा म्हणून सादर केले तेव्हाच आदित्य निवडणूक मैदानात उतरणार याचे संकेत दिले गेले होते. या निमित्ताने ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटप झाले असून भाजप १४४ तर शिवसेना १२६ जागा लढविणारा आहेत. मित्रपक्षांना १८ जागा सोडल्या गेल्या आहेत.

भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते असे प्रत्यक्ष संकेत दिले होते. २०१४ च्या निवडणुकात शिवसेना भाजप यांच्यात जागा वाटपावर तोडगा निघाला नव्हता त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती आणि त्यानंतर युती करून सरकार बनविले होते.

Leave a Comment