पाणी जिरवण्याचे महत्त्व

water
महाराष्ट्रात पाणी किती महाग आहे हे आपण पाहिले आहे. भरपूर पाऊस आणि भरपूर पाणी म्हणजे छान शेती असा कोणाचा समज असेल तर तो त्यांनी सोडून दिला पाहिजे कारण जिथे भरपूर पाणी आहे तिथे सुख समृद्धी आहे असे काही दिसत नाही. याबाबत भारताचा एक जलशास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. भारताचे दोन भागात विभाजन करून एक पाहणी करण्यात आली. कानपूर हे शहर भारताच्या मध्यभागी धरून त्याच्या पूर्वेचा भारत देश आणि त्याच्या पश्‍चिमेचा भारताचा भूभाग यांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या- म्हणजे प्रचंड- नद्या कानपूरच्या पूर्वेच्या प्रदेशातून वहात जातात. त्या उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग म्हणजे पूर्वांचल, बिहार, प. बंगाल, आसाम आणि ओरिसा या राज्यातून वहात जात असतात. तिथे अमाप पाणी उपलब्ध आहे. या नद्यांना पूर आला तर गावेच्या गावे वाहून जातात. म्हणजे या नद्यांची पात्रे काही गावांना आपल्या पोटात घेण्याची क्षमता बाळगतात. ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र तर पाच किलो मीटर रुंद आहे.

दोन वर्षांपूर्वी कोसी नदीला पूर आला होता तेव्हा तो इतके भयकारी होता की त्यामुळे दोन कोटी लोकांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्या मानाने कानपूरच्या पश्‍चिमेला राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाचा पश्‍चिम भाग आणि विशेषत: हरियाणा या राज्यात पाण्याची उपलब्धता कमी आहे.या भागात मोठ्या नद्या नाहीत आणि पाऊसही कमी पडतो. नद्यांना पूर येतात पण पूर्वेला येणार्‍या पुरांच्या मानाने ते पूर किरकोळ असतात. गंमतीचा भाग असा आहे की, भरपूर पाणी असलेल्या पूर्व भागात पश्‍चिमे पेक्षा जास्त दारिद्य्र आहे. पाणी असून गरिबी आणि पाणी कमी असून संपन्नता असे विसंगत चित्र दिसते. पाणीदार भागात बिहारसारखे सर्वात मागासलेले राज्य आहे. याच भागात प.बंगालचा उत्तर भाग आहे. जिथले लोक नेहमी रोजगाराच्या शोधात अन्य राज्यात ङ्गिरत असतात. ओरिसा हे राज्य याच भागात आहे ज्या राज्यात देशातल्या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचे सर्वात जास्त प्रमाण आहे. पश्‍चिम भागातल्या राज्यांतली शेती पाणी कमी असूनही पूर्वेपेक्षा चांगली आहे. देशातलेच काय जगातले सर्वात अधिक पाऊस पडणारे म्हणजे ४५० इंच पाऊस पडणारे शहर याच पूर्व भागात आहे.चेरापुंजी येथे जगातला सर्वात अधिक पाऊस पडत असे पण आता या गावाचे हे रेकॉर्ड मोडले गेले आहे. मेघालयातल्याच मोसीयनराम या गावात आता चेरापुंजी पेक्षा अधिक पाऊस पडत आहे. तिथे २००९ साली ४६० इंच पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातले आपल्या सारखे लोक या पावसाची कल्पनाच करू शकत नाही कारण तिथे महाराष्ट्रात वर्षात जेवढा पाऊस पडून जातो तेवढा पाऊस काही तासांत पडून जात असतो. या उलट जगातला सर्वात कमी पाऊस कानपूरच्या पश्‍चिमेला असलेल्या राजस्थानातल्या जैसलमेर या शहरात नांेंदला जातो. तो सरासरी पाच इंच असतो. एवढा पाऊस मौसीयनराम या गावात काही मिनिटांत पडून जात असेल. पण चेष्टेचा विषय असा की जैसलमेर या गावात भर उन्हाळ्यातही कधी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत नाही. मौसीयनराम गावात मात्र एवढा पाऊस पडूनही २६ जानेवारी पासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. कारण जैसलमेर मध्ये पाणी कमी पडत असले तरीही त्यातला थेंब थेंब अडवला जातो तर मौसीयनराम गावातले पाणी अडवले आणि जिरवले जात नाही. ते वाहून जाते. पाण्याच्या बाबतीत नेमके काय घडलेले आहे, याचा थोडासा विचार केल्यास दोन गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा उपसा आणि वापर वाढलेला आहे. दुसर्‍या बाजूला जमिनीत पाणी त्या प्रमाणात मुरवले जात नाही. १९७२ च्या दुष्काळापूर्वी महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या आतील पाण्याची पातळी बरी होती. विहिरी खोल जात होत्या, परंतु थोड्याच दिवसात खोल गेलेली पातळी भरून सुद्धा निघत होती. मात्र पाण्याचा जेवढा उपसा होतो तेवढेच पाणी पुन्हा जमिनीत झिरपले की उपसलेल्या पाण्यामुळे खाली गेलेली पातळी जेवढ्यास तेवढी होऊन जाते. म्हणजे पाण्याचा उपसा करताना त्यामुळे खोल जाणारी पातळी पुन्हा भरून निघणार आहे का ? याचा विचार करायला हवा.

पावसाळ्यात पडणार्‍या पावसामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी पाच ङ्गुटाने वाढणार असेल तर आपण नंतरच्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाचच ङ्गूट पाणी उपसा करून वापरले पाहिजे. पण झाले मात्र उलटे आहे. पाण्याची पातळी दहा-बारा किंवा पंधरा ङ्गुटापर्यंत खाली जाईल एवढा पाण्याचा उपसा सुरू आहे आणि त्याची भरपाई मात्र होत नाही. आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये दरवर्षाला दहा हजार रुपयांची भर पडत आहे आणि आपण त्या तिजोरीतून दर वर्षाला १५ हजार रुपये काढून खर्च करत आहोत. अशा वेळी त्यात तिजोरीतले पैसे एकेदिवशी संपून जातील, हे सांगायला मोठ्या अर्थतज्ञाची गरज नाही.आपण १५ हजार रुपये खर्च करत असताना तिजोरीत दरसाल किमान १५ हजार रुपयांची भर घातली पाहिजे. त्यापेक्षा जास्त घातले तर चांगलेच. असे झाले तरच तिजोरीमध्ये पैसे जमा होत राहतील. नाहीतर एक दिवस तिजोरीचा खडखडाट झाल्याशिवाय राहणार नाही. नेमका हाच न्याय शेतातल्या पाण्याला लागू होतो. आपल्या पूर्वजांनी जमिनीत भरपूर पाणी मुरवलेले होते. पाण्याची पातळी चांगली होती. २५-३० ङ्गूट खोल खोदले की पाणी लागत होते. परंतु आपण नवनवी यंत्रे शोधून काढली, वेगाने पाण्याचा उपसा केला आणि जमीनरूपी तिजोरीतले जास्त पाणी खेचायला सुरुवात केले. त्यामानाने पाणी जिरवून त्या तिजोरीतल्या पाण्याचा साठा पूर्वीइतका करण्याची मात्र आपण दक्षता घेतली नाही. परिणामी तिजोरीत खडखडाट झाला.

Leave a Comment