18,000 रुपयांच्या दंडामुळे ऑटो रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न


अहमदाबाद: देशात नवीन वाहतुक नियम लागू झाल्यापासून लोकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून प्रचंड दंड वसुल केला जात आहे. देशाची राजधानी दिल्लीतच नव्हे, तर देशातील इतरही अनेक भागांत लोक दंडाचे प्रमाण प्रमाण वाढल्यामुळे चिंतेत आहेत. याच अनुषंगाने, ऑटो रिक्षाचालकास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चलानही देण्यात आले होते, यामुळे तो इतका नाराज झाला की त्याने चक्क आत्महत्येचा प्रयत्नही केला.

हे प्रकरण गुजरातमधील अहमदाबाद येथील सांगितले जात आहे, जेथे एका ऑटो रिक्षाचालकास ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 18,000 रुपयांचा दंड करण्यात आला होता. दंड न दिल्यास त्याची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली, त्यानंतर या चालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तथापि, त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले.

यावर ऑटो रिक्षाचालकाचे म्हणणे आहे की आपण खूप गरीब असल्यामुळे त्यामुळे एवढ्या मोठ्या दंडाची रक्कम देण्याची आपली परिस्थिती नाही. दंडाचे पैसे न दिल्याने त्यांची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली, यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही. त्याने बीकॉमचे शिक्षण घेतले आहे, पण नोकरी मिळाली नाही, म्हणून त्यांनी ऑटो रिक्षा चालवण्यास सुरवात केली, असेही तो सांगतो. पण तेही आता जप्त केले गेल्यामुळे तो कामावर जाऊ शकत नाही आणि त्याला आर्थिक टंचाई सामना करावा लागत आहे.

1 सप्टेंबर रोजी नवीन वाहतुक नियम लागू करण्यात आले, तेव्हापासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बर्‍याच लोकांना दंड ठोठावण्यात आला. दिल्लीमध्ये, ट्रकसाठी दोन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे, तर ओडिशाच्या संबलपूर येथे एका ट्रक चालकाला सात वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 6.53 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये बदल करून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंडांच्या रक्कमेत जवळपास 5 पटीने वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment