सर्व्हिस ऍट युवर डोअर

door-step
सध्याचे जीवन धकाधकीचे झाले आहे आणि त्यातूनच कोणत्याही सामान्य परिस्थितीतल्या सुशिक्षित बेकाराला कसलीही गुंतवणूक न करता उभारता येईल असा हा व्यवसाय विकसित झाला आहे. लोकांची गरज काय आहे लक्षात घ्या. अतीशय बिझी असलेल्या लोकांना विम्याचा हप्ता भरायला वेळ नसतो. बँकेत एखादा चेक भरायचा असल्यास त्यालासुध्दा सवड मिळत नाही. मुलांना शाळेत नेऊन सोडणे, घेऊन येणे, लॉंड्रीचे कपडे नेऊन टाकून घेऊन येणे, निरनिराळ्या प्रकारची बिले भरणे ही कामेसुध्दा करण्याइतका वेळ लोकांना नसतो. घरातला एखादा नळ टपकत असतो. पण त्यासाठी प्लंबर शोधून त्याला घेऊन येणे एवढा अवसर लोकांना मिळत नाही. आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी हाताखाली एखादा घरगुती नोकर ठेवावा तर तेही परवडत नाही. कारण त्याला पूर्णवेळ काम नसते आणि अनेक छोटी छोटी कामे तर स्वतःला करता येत नाहीत. अशा लोकांची ही सर्व छोटी कामे करून देणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. खरे म्हणजे हा व्यवसाय म्हणजे दुसरे तिसरे काही नसून लोकांसाठी केलेली दैनंदिन कामातली इव्हेंट मॅनेजमेंटच असते.

हा व्यवसाय करणार्‍या लोकांना एक चांगली सोय असते. त्याला प्रत्येकाचे बिल भरायला प्रत्येक वेळी जाण्याची गरज नाही. आपण जेवढ्या लोकांना ही सेवा देत आहोत. तेवढ्या लोकांची सारी बिले एकदाच गोळा करून योग्य त्या ठिकाणी नेऊन भरली की सेवा देणार्‍याचेही काम सोपे होते. म्हणजे त्याला फार काबाडकष्ट करावे लागत नाहीत. परंतु लोकांची मात्र छान सोय होते. या सगळ्या छोट्या छोट्या कामांबद्दल छोटे मोठे बिल आकारले तर लोकांनाही त्याचे काही वाटत नाही. अन्यथा त्यांना या कामासाठी खूप गैरसोयी सहन करावी लागत असते. एखादा चेक भरायचा झाला किंवा घराचा हप्ता भरायचा झाला तर तो भरून ऑफिसला जायला उशिर होतो आणि ऑफिसमध्ये लेटमार्क पडतो. काही काही लोकांना तर अशा किरकोळ कामांसाठी अर्ध्या दिवसाची रजासुध्दा टाकावी लागते. घरातला नळ दुरूस्त करायला येणारा प्लंबर किंवा तसलाच कारागीर एक तर लहरी असतो आणि केव्हा येऊन आपला किती वेळ खाईल याची काही शाश्‍वती नसते. त्यामुळे असे काम कोणावर तरी सोपवले म्हणजे तेवढाच दिलासा मिळतो आणि त्यापोटी काही शुल्क द्यायला कोणी मागेपुढे पहात नाही. अशा प्रकारची २०-२५ बिझी कुटुंबे ताब्यात घेऊन त्यांची घरातली छोटी मोठी दुरूस्ती आणि घराबाहेरची अशी लहान सहान कामे केली तर त्यातून ती कामे करणार्‍या सुशिक्षित बेकाराला सुध्दा चांगला पैसा मिळू शकतो.

पुणे, मुंबई किंवा अशाच मोठ्या शहरांमध्ये अशा सेवेची फार गरज आहे आणि अनेक सुशिक्षित मुलेही अशी कामे करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातल्या काही मुलांकडे शैक्षणिक पात्रता, विशिष्ट प्रकारचे कौशल्य किंवा कॉम्प्युटरचे कोर्स नसतात अशा मुलांना हा सेवा देण्याचा उद्योग चांगली प्राप्ती करून देणारा ठरेल असा विश्‍वास वाटतो. पुण्याचे सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा उद्योगपती म्हणून झालेला उदय अशाच कामातून झालेला आहे. दुकानदारांच्या खराब झालेल्या पाट्या धुवून देणे, कोणाचे अगदी किरकोळ बांधकाम करून देणे, टेलिफोन रिसिव्हर स्वच्छ करून पुसून देणे अशी कामे ते करत असत. एखाद्या घरात टेलिफोन पुसायला गेल्यानंतर टेलिफोन ठेवलेल्या टेबलवरची पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली असत. टेलिफोन पुसल्यानंतर सहजच डी. एस. कुलकर्णी ती पुस्तके व्यवस्थित रचून ठेवत असत. घराचे मालक किंवा घरातली गृहिणी आपली पुस्तके रचून ठेवलेली बघून चकित होत असत. एवढी छोटी कामे करायला आपल्याला वेळ नाही पण हा मुलगा जाता जाता आपले काम करून जात आहे याचे त्यांना कौतुक वाटे.

मग एखादी गृहिणी किंवा घरमालक आपले तुटलेले फर्निचर दुरूस्त करायला त्याची मदत घेत असत. अशी छोटी मोठी कामे त्याच्याकडे यायला लागली आणि डी.एस. कुलकर्णी यांनी सारी कामे करणारी कारागीरांची टीमच तयार केली. अशा या छोट्या छोट्या कामातूनच त्यांच्या बँकेतल्या लोकांच्या ओळखी झाल्या. बर्‍याच मोठ्या लोकांशी संपर्क आला आणि त्यांना लोक घर रंगवण्याचे काम द्यायला लागले. त्यातून त्यांना चांगली प्राप्ती झाली आणि पुढे खिशात भांडवल नसतानाही या संपर्काच्या आधारावरच डी. एस. कुलकर्णी हे बडे बिल्डर झाले. एकंदरीत सामान्य वाटणारी कामे करीत करीत त्यांचा मोठा भांडवलदार म्हणून उदय झाला. खिशात एक दमडाही नसताना एवढा मोठा करोडपती होण्याची किमया त्यांना या छोट्या कामांनी आणि त्यातून निर्माण झालेल्या संपर्कांनी साधली. एखाद्या तरूण मुलाला हा सामान्य कामांचा व्यवसाय सुचवला तर त्याला तो त्याचा अपमान वाटेल. कारण थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर ही सेवा म्हणजे अनेकांच्या घरातला अत्यल्प वेळ घरगडी म्हणून काम करण्याची सेवा आहे. तेव्हा घरगडी होणे कोणालाच आवडणार नाही. पण सुरूवात या कामातून केली तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. हे मात्र डी. एस. कलकर्णी यांनी दाखवून दिले आहे.

Leave a Comment