हृदयाच्या मजबुतीने वार्धक्याला अटकाव

old-man
हृदयाची दुर्बलता ही माणसाला वार्धक्याकडे तर नेतेच पण ती वार्धक्याकडची वाटचाल आधी मेंदूमध्ये दिसायला लागते. विस्मरण होणे, एखादी गोष्ट लवकर न समजणे अशा गोष्टीतून साधारण पन्नाशीमध्येच हे वार्धक्य प्रतित व्हायला लागते. मात्र व्यायाम करून हृदयाची मजबुती वाढविणार्‍या लोकांना या गोष्टी थोड्या उशीरा सुरू होतात. कारण या सार्‍या दोषांचे मूळ मेंदूत असते. मेंदू काम करेनासा झाला की, ही लक्षणे प्रकट व्हायला लागतात.

साधारण पंचेचाळीशी उलटली की, रक्तवाहिन्या कठीण व्हायला लागतात आणि रक्तप्रवाहात अडथळे यायला लागतात. रक्तवाहिन्यांच्या या दोषांची सुरुवात हृदयाकडून मेंदूकडे जाणार्‍या रक्तवाहिनीमध्ये होते. म्हणजे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. म्हणजे वार्धक्याची सुरुवात मेंदूला होणारा रक्तपुरवठा क्षीण होण्याने होते. परंतु ज्याने तरुण वयात व्यायाम करून हृदय मजबूत केलेले असते त्यांना हा दोष लवकर स्पर्श करत नाही.

रक्तवाहिन्या कडक होण्याची प्रक्रिया जितकी लांबेल तितके वार्धक्य लांबेल हे लक्षात ठेवले पाहिजे आणि ही प्रक्रिया लांबणे हृदयाच्या मजबुतीवर अवलंबून आहे. आपण आपली वार्धक्याकडची वाटचाल काही प्रमाणात रोखली आहे की नाही हे समजण्याची निशाणी म्हणजे स्मरणशक्तीवर होणारा परिणाम. ज्या लोकांना चाळीशी-पंचेचाळीशीतच स्मरणाविषयीचे काही दोष दिसायला लागतात त्यांना ही एक धोक्याची सूचना असते. एखादा माणूस आपल्याला पूर्वी भेटलेला असतो, परंतु तो जेव्हा दुसर्‍यांदा भेटतो तेव्हा त्याचे नावच आठवत नाही. असे झाले की, समजावे आपली वाटचाल वार्धक्याकडे सुरू झालेली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment