लेखन हाही व्यवसायच

writing
आपण स्वत:चे भांडवल न गुंतवता करता येण्यासारख्या अशा व्यवसायांची माहिती घेत आहोत की, ज्यामधून आपल्याला बर्‍यापैकी किंवा उत्तम उत्पन्न मिळू शकेल. अशा व्यवसायात लेखन हा एक चांगला व्यवसाय आहे. लेखनातून आपण कोणाचीही नोकरी न करता चांगली प्राप्ती करून घेऊ शकतो. पूर्वी लिहिणार्‍या आणि वाचणार्‍यांची संख्या फार कमी होती. त्या काळात निरनिराळ्या सरकारी कार्यालयांच्या बाहेर लोकांचे अर्ज लिहून देणारे लेखनिक बसलेले असत. ज्याला लिहिता येत नाही त्याचे निरनिराळ्या प्रकारचे अर्ज लिहून देणे हाच त्यांचा व्यवसाय असे. एखाद्या अशिक्षित आणि निरक्षर व्यक्तीला सरकारकडून एखादे पत्र आलेले असे. ते त्याला वाचता येत नसे. ते वाचून दाखवणे हा सुद्धा एक व्यवसाय होता. अनेक पोस्ट कार्यालयांच्या बाहेर सुद्धा अशी लिहिणारी माणसे बसलेली असत. लोकांची पत्रे लिहून देऊन ती व्यवस्थित पत्ता लिहून पोस्टात टाकणे हे त्यांचे काम. त्याला लिहिता येत होतो एवढ्याच कौशल्यावर हा व्यवसाय अवलंबून होता. आता हे दृश्य तसे दुर्मिळ झाले आहे. कारण अगदीच लिहायला किंवा वाचायला येत नाही अशी माणसे फार कमी झाली आहेत.

पण जेव्हा काही लोकांवर सरकारचा एखादा किचकट फॉर्म भरण्याची वेळ येते तेव्हा लिहायला-वाचायला येत असूनही सुशिक्षित लोक तो फॉर्म बघूनच चक्रावून जातात. रेशन कार्ड मिळण्यासाठी भरावयाचा अर्ज किंवा वाहतूक परवाना मिळविण्यासाठी आर.टी.ओ. मध्ये भरावयाचा अर्ज नेमका कसा भरायचा हे पदवीधर लोकांना सुद्धा कळत नाही. मात्र जे लोक हा फॉर्म वारंवार बघत असतात. त्यांच्यासाठी मात्र तो सोपा असतो. कारण या फॉर्ममधल्या बहुतेक रकान्यांमध्ये नो नो नो असे लिहावे लागते. ते रकाने नेमके कोणते, हेच कळत नाही. त्यामुळे तिथे असे फॉर्म भरून देणारे व्यावसायिक काम करतात. मग नुसता फॉर्म भरण्यापेक्षा त्या फॉर्मला लागणारी सारी कागदपत्रे जोडून देऊन परवाना मिळवून देण्याचे काम तेच लोक करतात आणि यातूनच एक नवा व्यवसायच निर्माण होतो. घरजागा, वाहन किंवा मोकळी जागा यांची खरेदी-विक्री करताना त्याची नोंदणी करावी लागते आणि त्या नोंदणीचा दस्त लिहिणे काही विशिष्ट लोकांनाच माहीत असते. त्यातून त्यांचा व्यवसाय तयार झालेला असतो. अशा प्रकारे काही विशिष्ट पद्धतीने विशिष्ट गोष्टी लिहिण्याची सवय झालेले लोक लिहिण्याच्या व्यवसायातून आपली उपजीविका साधत असतात. म्हणजे हा सुद्धा एक केवळ पोट भरण्याचा नव्हे तर उत्तम प्राप्ती करून देणारा व्यवसाय झाला आहे.

हा लिहिण्याचा तांत्रिक भाग झाला. काही लोकांना परमेश्‍वराने जबरदस्त प्रतिभाशक्ती प्रदान केलेली असते. ते लोक कविता करू शकतात, कथा लिहू शकतात, कादंबर्‍याही लिहू शकतात. अशा लिखाणाचे कौशल्य वृद्धिंगत केले आणि त्यातून स्वत:च्या लिखाणाचे उत्तम मार्केटिंग केले तर लिखाणातून चांगला पैसा मिळू शकतो. लिखाणाच्या जोरावर प्रचंड पैसा कमविणारे लोक सुद्धा आहेत. असे लोक संख्येने कमी असतील, पण प्राथमिक अवस्थेत लिखाण करून बर्‍यापैकी पैसा कमावणे बहुतेक लेखकांना फार अवघड राहिलेले नाही. अर्थात अशा प्रकारचे लिखाण करणे हे उत्तम प्रतिभाशक्ती प्राप्त झालेल्या लेखकांनाच शक्य आहे. असे असले तरी लिखाणाची काही अंगे अशी आहेत की, ज्याचा परमेश्‍वरदत्त प्रतिभाशक्तीशी काही संबंध नाही. विशेषत: पत्रकार म्हणून करावयाचे लेखन हे कथा-कादंबर्‍या लिहिण्यापेक्षा वेगळे असते आणि हा वर्ग समाजामध्ये फिचर रायटर म्हणून प्रसिद्ध आहे. विविध वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांमध्ये नवीनवी माहिती लिहिणारे, घटनांचे विश्‍लेषण करणारे आणि मुलाखतींवर आधारलेले लेखन करणारे स्तंभ लेखक या वर्गात मोडतात. स्तंभ लेखन हा उत्तम बिनभांडवली उद्योग आहे.

प्रत्येक स्तंभलेखक किंवा फिचर रायटर हा माध्यमांशीच प्रत्यक्ष संपर्क साधू शकत नाही आणि माध्यमे सुद्धा अशा लेखकांशी संपर्क साधू शकत नाहीत. अशावेळी या दोघांच्या मध्ये मध्यस्थी करणार्‍या काही संस्था आहेत. एका बाजूला लेखकांना आणि स्तंभ लेखकांना गाठणे आणि दुसर्‍या बाजूला माध्यमांशी संपर्क ठेवणे अशी कामे हे लोक करतात. अशा फिचर्स सिंडिकेटमध्ये हजारो रुपयांची उलाढाल होते. ते वृत्तपत्रांची लेखांची गरज पुरी करतात आणि दुसर्‍या बाजूला स्तंभ लेखकांना वाव देतात. कसल्याही प्रकारचे भांडवल न गुंतवता असा व्यवसाय करता येतो. रेडिओ, टीव्ही या माध्यमांमध्येही लेखनाला चांगला वाव आहे. टीव्ही वरच्या मालिका आणि रेडिओवरच्या श्रुतिका यांचे लिखाण करणारे लेखक हवे असतात. तेव्हा याही लिखाणातून पैसा कमावता येतो. काही लोकांना आपले विचार प्रसिद्ध व्हावेत असे वाटत असते. परंतु त्यांच्या लिखाणाची हातोटी नसते. असे लोक चांगली लेखनशैली अवगत असणार्‍या लेखकाच्या शोधात असतात. विचार त्यांचे, पण लेखन मात्र त्या लेखकाचे. अशा एकत्री करणातून काही ग्रंथ साकार होतात. अशा लेखकांना घोस्ट रायटर म्हटले जाते. अशा लेखनातूनही चांगली प्राप्ती होते. ज्याचे विचार आपण लिहित असतो त्याच्याकडून हे पैसे दिले जातात. विविध संस्था आणि संघटनांना आपल्यावरचे लेख छापून यावेत असे वाटत असते. त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर लेख लिहिणे हा सुद्धा एक चांगली प्राप्ती करून देणारा व्यवसाय होऊ शकतो.

Leave a Comment