मातेच्या दुधाला पर्याय नाही

breast-feeding
लहान मुलाला सर्व पोषण द्रव्ये मिळण्याच्या बाबतीत आईच्या दुधाची बरोबरी कोणतेच दूध किंवा अन्न करू शकत नाही. तेव्हा जन्मापासून किमान एक वर्ष तरी मातेचे दूध मिळणे अनेक बाबतीत उपयुक्त आहे. ते बाळासाठी तर उपयुक्त आहेच पण स्तनदा मातेला तिच्या आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. खालील पाच कारणांसाठी मातेचे दूध अपरिहार्य आहे.

१) पोषण द्रव्ये – नवजात अर्भकाला ज्या जीवनसत्वांची आणि मूलद्रव्यांची गरज असते ती तर मातेच्या दुधात असतातच. त्यामुळे तर ते दूध त्याच्या गरजेचे असतेच. मात्र ही सारी पोषण द्रव्ये मातेच्या दुधामध्ये मुलाला पचण्यास सोपी जातील अशारितीने उपलब्ध असतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मातेच्या दुधातील पोषण द्रव्यांचे प्रमाण मूल जस जसे मोठे होत जाईल तस तसे बदलत जाते. त्याला ज्या महिन्यात ज्या घटकांची गरज आहे ते घटक त्या महिन्यात मातेच्या दुधात आपोआप विकसित झालेले असतात.

२) संरक्षण – जोपर्यंत मातेचे दूध पाजली जाते तोपर्यंत बाळाच्या आरोग्याला कसलीही बाधा येत नाही. कारण मातेच्या दुधात अनेक प्रकारची प्रतिजैविके असतात. विशेषत: प्रसुती झाल्याबरोबर जे दूध येते त्या दुधामध्ये अशी काही औषधी द्रव्ये असतात की, त्यामुळे मुलाचा घसा, फुफुसे आणि आतडी मजबूत होऊन संसर्गापासून मुक्त राहतात. मातेचे दूध प्राशन केल्याने बाळामध्ये बाल अवस्थेतला मधूमेह होण्याची शक्यता टळते.

३) मातेच्या दुधामध्ये बाळाच्या मेंदूची चांगली वाढ होण्यास उपयुक्त अन्य घटक असतात. योग्य वयापर्यंत मातेचे दूध प्राशन केलेली मुले आणि मातेचे दूध न मिळालेली मुले यांच्या बुद्धीमत्तेची तुलना केली असता स्तनपान केलेल्या मुलांची बुद्धीमत्ता तीव्र असल्याचे आढळले.

४) लहान मुलासाठी वयाची पाच वर्षे उलटेपर्यंत आई हेच सर्वस्व असते. या दोघांमध्ये जेवढे प्रेम आणि सहवास असेल तेवढे मूल मानसिकदृष्ट्या सक्षम राहते आणि स्तनपानामुळे या दोघातील आपुलकी अधिक वृद्धिंगत होत असते आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्तनपान करेपर्यंत मातेचे आरोग्य सुद्धा चांगले रहात असते. १९९२ सालपासून जगभरामध्ये १ ते ७ ऑगस्ट हा आठवडा स्तनपान सप्ताह म्हणून पाळावा असे आवाहन करण्यात आले आणि आज १२० देशात हा सप्ताह पाळला जातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment