पाण्यातून पसरणारे विकार

water
भारतामध्ये सर्वांना शुध्द पिण्याचे पाणी अजूनही मिळत नाही. उत्तर भारतातील हजारो, लाखो लोक नदीचे पाणी पितात. त्या नदीमध्ये अनेकांनी गाड्या धुतलेल्या असतात, जनावरे धुतलेली असतात, वाट्टेल ती घाण त्यात मिसळलेली असते. परंतु ते लोक तसेच पाणी पितात. त्यातून त्यांना अनेक प्रकारचे रोग होतात. ग्रामीण भागातील लोकांच्या आजारांचा एक अंदाज घेतला असता असे लक्षात आलेले आहे की या भागातील लोकांत पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडतेच परंतु त्यांची उत्पादकतासुध्दा कमी होते.

पोटांच्या विकारासोबतच पाण्यातून टायफॉईड, मलेरिया, हगवण, कॉलरा, हिपॅटायटिस असे अनेक विकार पसरत असतात आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार जगात दरवर्षी १८ लाख लोक या विकारामुळे मरण पावतात. या १८ लाख लोकांत लहान मुले आणि त्यातल्या त्यात अविकसित देशातील मागासलेली मुले मोठ्या संख्येने असतात.

हे विकार पसरू नयेत असे वाटत असेल तर खालील उपाय योजले पाहिजेत. काही सोप्या उपायांनीसुध्दा हे विकार टाळता येतात. पाणी साठवण्याचे भांडे दररोज धुतले पाहिजे. स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी हात साबणाने धुतले पाहिजेत. मुलांना वेळोवेळी हात धुण्याची सवय लावली पाहिजे. शौचाला जाऊन आल्यावर हात साबणाने धुतलेच पाहिजेत. लहान मुलांनी शी केल्यानंतर आई त्याचे कपडे बदलते. पण त्यानंतरसुध्दा हात धुतले पाहिजेत.

स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, फळे ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पाहिजेत. अन्न झाकून ठेवले पाहिजे. घराला पाणी पुरवणारी पाईपलाईन किंवा नळ स्वच्छ आहे की नाही हे पाहिले पाहिजे. टोपली संडास बंद केले पाहिजेत. फ्लशचे संडास असतील तर संडासच्या पॉटमध्ये विष्ठेचे अंश थोडेही राहणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासाला जाताना बाटलीतले स्वच्छ पाणीच नेले पाहिजे. बाहेर कुठेही पाणी पिऊ नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment