जमीन आणि मातीचा अभ्यास

land
आपली जमीन आणि माती हिला ‘काळी आई’ असे म्हणतात पण त्या मागची भावना काय आहे ? जमीन ही काही निर्जिव वस्तू नाही तो एक सजीव घटक आहे. तिला जीव आहे. म्हणूनच तिच्यात मानवी जीवनाला आवश्यक असलेल्या अन्नाची निर्मिती करण्यासाठी गरजेची असलेली जैविक प्रक्रिया घडू शकते. शेती ही जैविक प्रक्रिया आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. जैविक प्रक्रिया म्हणजे काय ? याचा बोध झाल्याशिवाय आपल्याला शेती करण्यामागचा सिद्धांत कळायचा नाही आणि शेतीतले सेंद्रीय घटकही उमजायचे नाहीत. आपल्या वापरातल्या अनेक वस्तू अजैविकपणे तयार होतात. आपल्या लेखनातला पेन, वाहन, रेडिओ, टी.व्ही. या वस्तू कशा तयार होतात ? रेडिओसाठी लागणार्‍या काही ङ्गायबरच्या वस्तू आणि काही छोटी यंत्रे यांचे एकत्रीकरण करून रेडिओ तयार होतो.

या सार्‍या निर्जिव वस्तूंची ती बेरीज असते. रेडिओ तयार करण्याच्या प्रक्रियेत कोठेही आपोआप काही घडत नाही, पुनरुत्पादन होत नाही. रेडिओसाठी आणलेल्या निर्जिव वस्तूंचे मिळून वजन २ किलो असेल तर त्या वस्तूंच्या जोडणीतून तयार होणारा हा रेडिओ २ किलो वजनाचाच असेल. म्हणजेच रेडिओ तयार करणे ही क्रिया निर्जिव आहे. शेतीचे तसे नाही. शेतातल्या मातीत एक दाणा पेरला की, १०० दाण्यांचे कणीस तयार होते. या कणसातले नव्याने निर्माण झालेले ९९ दाणे काही बाहेरून आणून कणसाला चिकटवलेले नाहीत ते ‘तयार’ झाले आहेत. त्यांना तयार करण्याची प्रक्रिया जैव तांत्रिक प्रक्रिया आहे. ती मातीतच होऊ शकते. कारण माती हा जैविक सजीव घटक आहे.

निसर्गाने शेतीला, बियाणांना आणि मातीला दिलेले हे एक अजोड वरदान आहे. आई मुलाला जन्म देते आणि नंतर त्याचे भरण-पोषण करते तशी ही काळी आई तिच्या पोटात तयार होणार्‍या या पिकांचे भरण-पोषण करत असते. ही बहुरत्ना वसुंधरा शतकानुशतके आपले हे कर्तव्य बजावत आहे आणि तिच्या या सामर्थ्यावर आपले म्हणजे मानवाचे भरण-पोषण होत आहे. ही मानवी जमात जमिनीच्या या सामर्थ्यामुळेच जिवंत राहिली आहे. मानव नावाचा हा गुंतागुंतीची शरीररचना असणारा प्राणी या पृथ्वीतलावर अस्तित्वात आला, जगला आणि वाढला याला ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यात पर्यावरण, हवा, हवेतला ऑक्सिजन, पाणी, पाऊस या बरोबरच शेती ही प्रक्रियाही समाविष्ट आहे. पृथ्वीवर बाकी सारे असते आणि शेती हा व्यवसायच नसता तर माणसाचे अस्तित्व टिकणे ङ्गार कठीण गेले असते. अशा या शेतीकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. पहिला दृष्टीकोन आहे जडवादी आणि दुसरा आहे चैतन्यवादी. जडवादी लोक या मातीकडे एक निर्जिव घटक म्हणून बघतात. त्यांच्या दृष्टीने तिला आई वगैरे मानणे हा भंपकपणा आणि अंधश्रद्धा आहे. आई वगैरे काही नाही ती एक उत्पादनाला आवश्यक असलेली वस्तू आहे असे हे लोक मानतात. आपण भारतीय शेतकरी मात्र तिला सजीव घटक मानतो. तिला देव समजतो आणि तिची पूजा सुद्धा करतो. आपल्या या दृष्टीकोनात भोळा भाव दिसत असेल पण त्यामुळे आपल्या शेतीच्या मशागतीत अनेक चांगल्या परंपरा निर्माण झाल्या आहेत आणि आता त्या परंपरांचे महत्व ध्यानी यायला लागले आहे.

Leave a Comment