साळवेंची १ रु.फी देऊन कन्येने केला पुरा सुषमांचा वादा

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी त्यांच्या मृत्युपूर्वी काही तास अगोदर देशातील प्रसिद्ध वकील आणि माजी सॉलीसिटर हरीश साळवे यांच्याशी फी संदर्भात केलेला वादा सुषमा यांची कन्या बासुरी हिने पूर्ण केला आहे. सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांनी या संदर्भात ट्विट करून त्याला सुषमा यांचे ट्विटर हँडल टॅग केले आहे. त्यात कौशल म्हणतात, सुषमा स्वराज, तुमची अपुरी इच्छा बासुरीने पूर्ण केली आहे.

पाकिस्तानच्या कैदेत हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेले नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्याचे काम प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी केले आणि त्यासाठी १ रु. प्रतीकात्मक फी आकारली. या केसचा निकाल भारताच्या बाजूने लागला तेव्हा परराष्ट्रमंत्रीपदी सुषमा स्वराज होत्या. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविले तेव्हा हरीश साळवे यांनी त्यांना फोन केला होता आणि तेव्हा सुषमा यांनी तुमची १ रु. फी उद्या सहा वाजता येऊन घेऊन जा असे सांगितले होते आणि त्याच रात्री सुषमा यांची प्राणज्योत मालवली होती. साळवे यांना सुषमा याचे निधन झाल्याचे कळले तेव्हा हे संभाषण आठवले कारण थोड्याच वेळापूर्वी त्या त्यांच्याशी बोलल्या होत्या. सुषमा यांच्या निधनाचा त्यांना धक्का बसला होता.

Leave a Comment