माझ्या राजीनाम्यामुळे जे कोणी दुखावले त्यांची माफी मागतो : अजित पवार


मुंबई – शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांनी आज दुपारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. माझ्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना माहितीच नव्हते की मी राजीनामा का दिला? मी आता महाराष्ट्राला सांगू इच्छितो अशी काही वेळ जेव्हा आली तर समजा मी पक्षातील लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असेच सांगितले असते. मी ज्यांना न सांगता हे केले त्यांची मी माफी मागतो असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी मी हरिभाऊ बागडेंना एक फोन केला होता आणि त्यांना विचारले की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? शिखर बँकेत संचालक म्हणून आम्ही सगळे काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली असल्यामुळे ज्यांना माझ्या राजीनाम्यामुळे वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.

शरद पवार यांचा शिखर बँक प्रकरणात दुरान्वये काहीही संबंध नाही तरीही त्यांचे नाव या घोटाळ्यात गोवण्यात आले. शरद पवार यांचे नाव ईडीने अशासाठी दिले की अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. शरद पवार आणि मी नातलग असल्याने त्यांचे नाव ईडीने या प्रकरणात आणले. मी या सगळ्यामुळे खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच हे सगळ निवडणूक जाहीर झाल्यानंतरच समोर का आले? असाही प्रश्न त्यांनी विचारला. 2010 च्या प्रकरणात 2019 मध्ये गुन्हा का दाखल केला ? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला. त्याचबरोबर पवार कुटुंबात कोणताही काहीही कलह नाही, कशाचा गृहकलह? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसेच शरद पवारांचा शब्द आमच्या कुटुंबात अंतिम असतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राजीनामा मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन दिला असल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 25 हजार कोटींचा घोटाळा शिखर बँक प्रकरणात झाल्याचा आरोप करण्यात आला. 12 हजार कोटीपर्यंत ज्या बँकेच्या ठेवीच आहेत त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार जेवढे आक्रमक आहेत तेवढेच ते भावूकही असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील यांचीही अजित पवार यांच्यासोबत उपस्थिती होती.

Leave a Comment