आयआयटीतील एमटेकच्या फीमध्ये तब्बल 900 टक्क्यांनी वाढ

आयआयटी काउंसिलने एमटेक प्रोग्रामच्या फीमध्ये तब्बल 900 टक्क्यांनी वाढ करून एमटेक आणि बीटेकसाठी समान फी आकारण्यास मंजुरी दिली आहे. बीटेकची फी ही वर्षाला 2 लाख रूपये आहे. तसेच, आयआयटीमध्ये एमटेकसाठीची प्रवेश आणि ट्यूशन फी प्रत्येक सेमिस्टरसाठी ही सध्या 5 हजार ते 10 हजार एवढी आहे.

याशिवाय आयआयटीमध्ये गेट स्कोरच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे 12 हजार 400 रूपये मानधन देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत प्राध्यापकांना पाच वर्षानंतर त्यांच्या कामगिरीच्या आधारावर त्यांना नोकरीवर ठेवायचे की नाही, यासाठी टेन्यूर ट्रॅक पॅथवेला देखील मंजूरी देण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईत एमटेक ट्यूशन फी 5 हजार रुपये आहे. तर आयआयटी दिल्लीत 10 हजार रुपये फी घेतली जाते. आयआयटी मद्रासमध्ये हीच फी 5000 रूपये आहे, मात्र ऑनलाइन वनटाइम रक्कम 3,750 रुपये आहे. आयआयटी खरगपूरमध्ये पहिल्या सेमिस्टरची फी 25,950रुपये आहे. त्यातील 6 हजार रुपये रिफंड होतात. त्यानंतर पुढील सेमिस्टरसाठी 10,550 रूपये फी घेतली जाते. 23 पैकी जुन्या 7 आयआयटीमध्ये 14 हजार एमटेकचे विद्यार्थी आहेत.

Leave a Comment