विंध्यवासिनी मातेचे कृष्णाशी असे आहे नाते

रविवारी देशभरात देवीचा मोठा उत्सव म्हणजे नवरात्रीची सुरवात होत असून या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. या काळात देशातील बहुतेक सर्व देवी मंदिरात भाविकांची देवीदर्शनासाठी गर्दी होईल. त्यातही काही प्रसिद्ध मंदिरात अलोट गर्दी होईल. अश्या प्रमुख मंदिरातील एक आहे उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर मधील विंध्यवासिनी मंदिर. विंध्याचल पर्वतरांगात वसलेले हे स्थान जागृत आहे आणि सृष्टीच्या आरंभापासून महाप्रलयानंतरही ते कायम राहणार असा समज आहे. विशेष म्हणजे या स्थानापासून ३ किमी परिसरात अन्य दोन देवी स्थाने आहेत यांनी या तिन्ही देवींची त्रिकोण यात्रा केली जाते.

(Source)

माता विंध्यवासिनी दुर्गेच्या ५१ शक्तीपिठातील स्थान नाही मात्र तरीही ते तितकेच पवित्र मानले जाते. असे सांगतात उन्मत्त झालेल्या कंसाचा वध करण्यासाठी देवकी वसुदेवाचा आठवा पुत्र म्हणून कृष्णाने जन्म घेतला होता. कंसाला देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करणार हे माहित होते म्हणून त्याने देवकी वासुदेवाला कैदेत टाकून मूल जन्माला आले की त्याला ठार करण्याचा सपाटा लावला होता. कृष्ण जन्मल्यावर वसुदेवाने त्याला टोपलीत घालून यमुना नदी पार करून मित्र नंद यशोदा याच्याकडे पोहोचविले आणि त्यांना त्याच वेळी झालेली रोहिणी नावाची मुलगी घेऊन वासुदेव परतला. कंसाने या मुलीला ठार करण्यासाठी उचलले तेव्हा ती आकाशात उंच गेली आणि तिने कंसाला तुझा मारेकरी जन्माला आहे आणि सुरक्षित आहे असे सांगितले. या मुलीने विंध्याचल पर्वताची निवड तिच्या वास्तव्यासाठी केली तीच ही विंध्यवासिनी असे सांगितले जाते.

(Source)

विंध्याचल ही तपोभूमी असून पुराणात त्याचे तसे वर्णन येते. येथे राहून तप करणाऱ्या साधकांना सिद्धी प्राप्ती होते असे मानले जाते. या पर्वत रांगात मधोमध विंध्यवासिनीचे मंदिर आहे. जवळच्या कालीखोल पर्वत गुहेत महाकाली आहे तर अष्टभुजा पर्वतावर अष्टभुजा देवी आहे. विंध्यवासिनी मंदिरातही या अन्य दोन देवीची मंदिरे आहेत. या तिन्ही देवींचे दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही असे मानले जाते. काही जण विंध्यवासिनी मंदिरातच या तिन्ही देवींचे दर्शन घेतात तर काही भाविक तिन्ही डोंगरावर जाऊन त्यांचे दर्शन घेतात.

असा समज आहे की नवरात्रात विंध्यवासिनी मंदिरावरील सुवर्णपताके मध्ये विराजमान असते. या देवीला काजलादेवी असेही नाव आहे. नवरात्रीत येथे देशविदेशातून भाविक दर्शनासाठी येतात.

Leave a Comment